अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:36 IST2025-08-02T09:35:34+5:302025-08-02T09:36:26+5:30
एकूण देणगी रकमेपैकी २२.२२ कोटी ७६ हजार ७७ रुपये भांडारगृहातून आणि ६.०९ कोटी ६९ हजार ४७८ रुपये दान कक्षातून मिळाले आहेत.

अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
चित्तोडगड - राजस्थानच्या मेवाड येथे श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान श्री सांवालिया सेठ यांच्या मंदिरात यंदा देणगीचा रेकॉर्ड मोडला आहे. मंदिर प्रशासनाकडून अलीकडेच ६ टप्प्यात देणगीच्या रक्कमेची मोजणी करण्यात आली. त्यात जवळपास २८ कोटी ३२ लाख ४५ हजार ५५५ रुपये रोकड जमा झाली आहे. त्याशिवाय १ किलो ४४३ ग्रॅम सोने, २०४ किलो चांदीही मंदिरात भेटवस्तू म्हणून मिळाली आहे. २३ जुलैपासून १ ऑगस्टपर्यंत ही मोजणी करण्यात आली. त्यात बँकेचे कर्मचारी, मंदिराचे सदस्य आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पारदर्शकतेने मोजणी करण्यात आली.
२३ जुलैला दानाच्या रक्कमेची मोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या टप्प्यात ७ कोटी १५ लाख, दुसऱ्या टप्प्यात ३ कोटी ३५ लाख, तिसऱ्या टप्प्यात ७ कोटी ६३ लाख, चौथ्या टप्प्यात ३ कोटी, पाचव्या टप्प्यात ८८ लाख ६५ हजार, सहाव्या टप्प्यात २० लाख ८५ हजार आणि अंतिम टप्प्यात २८ कोटी ३२ लाख रुपये इतकी रक्कम जमली. एकूण देणगी रकमेपैकी २२.२२ कोटी ७६ हजार ७७ रुपये भांडारगृहातून आणि ६.०९ कोटी ६९ हजार ४७८ रुपये दान कक्षातून मिळाले आहेत. याशिवाय भाविकांनी सोने-चांदीचे दागिने आणि धातूंचे दानही केले आहे. भांडारगृहातून ४१० ग्रॅम सोने, ८० किलो ५०० ग्रॅम चांदी आणि दान कक्षातून १ किलो ३३ ग्रॅम सोने आणि १२४ किलो चांदी मिळाली आहे.
विशेष कार्यक्रमाला भाविकांची संख्या वाढली
यावेळी कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भांडार उघडण्यात आले, त्यानंतर दानाची मोजणी अखंडपणे सुरू राहिली. हरियाली अमावस्या आणि रविवारी जास्त गर्दीमुळे मोजणीचे काम पुढे ढकलावे लागले. या विशेष धार्मिक प्रसंगी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक श्री सांवालिया सेठच्या दर्शनासाठी पोहोचले होते. भगवान श्री सांवालिया सेठ यांचे मंदिर केवळ राजस्थानसाठीच नव्हे तर देशभरातील कोट्यवधी भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक येथे दान-धर्म आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. यावेळी मिळालेल्या रेकॉर्डब्रेक देणगीमुळे मंदिराची वाढती लोकप्रियता लक्षात येते.