गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:23 IST2025-10-31T17:22:46+5:302025-10-31T17:23:11+5:30
Himachal Pradesh Crime News: तुरुंगातून फरार झालेल्या एका कैद्याने आपल्या उचापतींनी पोलिसांच्या नाकी नऊ आणल्याचा धक्कादायक प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये उघडकीस आहे. या कैद्याला पकडण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश आलेलं नाही.

गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
तुरुंगातून फरार झालेल्या एका कैद्याने आपल्या उचापतींनी पोलिसांच्या नाकी नऊ आणल्याचा धक्कादायक प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये उघडकीस आहे. या कैद्याला पकडण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश आलेलं नाही. या आरोपीने एका कुटुंबाचं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. एवढंच नाही तर या आरोपीने बुधवारी पीडित कुटुंबाच्या गोठ्याला आग लावल्याचेही समोर आले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चंबा जिल्ह्यातील बरौर पंचायतीमधील गदरी गावामधील हे संपूर्ण प्रकरण आहे. येथील एका मुस्लिम कुटुंबाला या आरोपीमुळे सध्या भीतीच्या छायेत दिवस काढावे लागत आहेत. तसेच या आरोपीसमोर चंबा पोलीस पूर्णपणे हतबल दिसत आहेत. या प्रकरणातील आरोपी इब्राहिम याने त्याच्याच काकांच्या नातीला फूस लावून पळवून नेले होते. तसेच तिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र मुलीचं लग्नाचं वय झालंलं नसल्याने पोलिसांनी इब्राहिम याला अटक केली होती. मात्र नंतर तो तुरुंगातून फरार झाला. तेव्हापासून तो सातत्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे.
दरम्यान, आरोपी इब्राहिम याने या मुलीच्या आजोबांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने पीडित कुटुंबाच्या गोशाळेबाहेर एक धमकी पत्र टांगून ठेवले होते. आता तुमचा शेवट निश्चित आहे, तुम्हाला वेचून वेचून ठार करेन, अशी धमकी त्याने या कुटुंबाला दिली होती. त्यानंतर प्रशासनाने या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. एवढंच नाही तर कुटुंबातील मुलांना शाळेत नेऊन आणण्याची जबाबदारीही पोलिसांनी उचलली आहे. मात्र पोलीस या आरोपीचं अजून काही करू शकलेले नाहीत. काल रात्री आरोपीने या कुटुंबाच्या शेतातील गवत आणि गोठ्याला आग लावली.
चंबा येथील तुरुंगातून इब्राहिम नावाचा हा कैदी २७ मे रोजी फरार झाला होता. त्याने २४ जून रोजी भीतीच्या छायेत असलेल्या या कुटुंबातील एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्यानंतर त्याने १० सप्टेंबर रोजी एक धमकी पत्र पाठवलं होतं. तर २९ ऑक्टोबर रोजी त्याने पीडित कुटुंबाच्या मालमत्तेची जाळपोळ केली.