Kalkaji Tree Accident video: बाप-लेक गाडीवरून जात होते. मुसळधार पाऊस सुरू होता. सगळीकडेच पाणीच पाणी. त्यामुळे वाहतुकही मंदावली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाजवळून त्यांची गाडी जाणार इतक्यात दबा धरून बसलेल्या मृत्यूने डाव साधला. झाड गाडीवर कोसळले आणि लेकीसमोर बापाने जीव सोडला. ही घटना घडली राजधानी दिल्लीत. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे दोन्ही व्हिडीओ अक्षरशः थरकाप उडवणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्लीत मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे कालवे बनले आहेत. अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. दिल्लीतील कालकाजी भागातही एक भयंकर अपघात झाला.
मोटारसायकल निघणार इतक्यात कोसळले झाड
कालकाजीमध्ये घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संततधार पाऊस सुरू असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरून जात असलेल्या वाहने हळूहळू पुढे जात असल्याचे दिसत आहे. बाजूला एक मोठे झाड आहे. या झाडाच्या जवळून एक दुचाकी निघून जाते आणि त्यानंतर दुसरी दुचाकी जाणार इतक्यात झाड मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांवर कोसळते.
गाडीवर झाड पडतानाचा व्हिडीओ पहा
झाडाच्या खोडाखाली दबली वाहने
घटना घडल्यानंतरचेही व्हिडीओ सोशल मीडियावर काही लोकांनी पोस्ट केले आहेत. यात मोटारसायकलवरील झाडाखाली दबलेले लोक आणि कार दिसत आहेत. लोक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणी झाडाच्या खोडाखाली दबलेली असून, मदतीसाठी ओरडताना दिसत आहे. खाली रस्त्यावर पाणी तुंबलेले दिसत आहे.
झाड कोसळल्यानंतरचा व्हिडीओ
झाड कोसळल्यानंतर या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. तातडीने झाड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आणि वाहने हलवण्यात आली.
या घटनेमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला. तर मुलगी थोडक्यात बचावली आहे. ती जखमी झाली आहे. यात आणखी काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.