धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:03 IST2025-05-23T10:55:44+5:302025-05-23T11:03:25+5:30
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीदरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे.

धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ती सोशल मीडियावर पाकिस्तानशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करण्याआधी ते व्हिडीओ दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिश याला पाठवत होती.
व्हिडीओ एडिटिंग आणि गुप्त माहितीवर नियंत्रण
दानिश ज्योतीने पाठवलेले हे व्हिडीओ बघायचा आणि या व्हिडिओंचे परीक्षण करून त्यातील संवेदनशील किंवा पाकिस्तानच्या सुरक्षेशी संबंधित माहिती वगळण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर ज्योती व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा एक योजनाबद्ध प्रचाराचा भाग असून पाकिस्तानच्या प्रतिमेला सांभाळत, भारतात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू यामागे असू शकतो.
बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार
तपासादरम्यान ज्योतीच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ पाठवण्याचे स्पष्ट पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. याशिवाय, तिच्या चार बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणा या आर्थिक व्यवहारांचा संबंध कोणत्याही परदेशी आर्थिक नेटवर्कशी आहे का, हे तपासत आहेत.
वकील करण्यासाठी पैसे नाहीत!
सध्या ज्योतीच्या वतीने कोणत्याही वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तिचे वडील, हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, "वकील करण्यासाठी आमच्याकडे आर्थिक पाठबळ नाही. गेल्या काही दिवसांत शेजारी आणि नातेवाईक देखील आमच्याशी संपर्क टाळत आहेत."
तपास यंत्रणा सध्या ज्योतीच्या ट्रॅव्हल पॅटर्न्सचा अभ्यास करत असून, तिने प्रवास केल्यानंतर संबंधित भागांमध्ये घडलेल्या दहशतवादी घटनांशी तिच्या व्हिडीओ पोस्टिंगचा काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत. विशेषतः, या प्रवासांचे आर्थिक प्रायोजक कोण होते? तिला आर्थिक मदत कोण देत होते? यासंबंधी तपास सुरू आहे.