मदुराई : मदुराई शहराच्या बाणेरगट्टा भागातील चंपकधाम मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या एका तरुणाच्या चीजवस्तू चाकूचा धाक दाखवून चोरणाऱ्या दोन सशस्त्र चोरट्यांनी त्या तरुणाचा हातही कापून पोबारा केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली.रविश नावाचा ३१ वर्षांचा तरुण जयलक्ष्मी या त्याच्या मैत्रिणीसोबत चंपकधाम मंदिरात आला. देवदर्शन झाल्यावर दोघे मंदिराशेजारील तलावाच्या काठी बसले होते. रविशला तहान लागली म्हणून त्याने तेथे फिरणाºया दोन-तीन मुलांकडे ‘पाणी आहे का?’, अशी चौकशी केली. त्यांच्यापैकी एक जण पाणी आणायला गेल्याचे त्या मुलांनी सांगितले.रविश पाणी आणण्याची वाट पाहत बसला असता अचानक त्यांच्यापैकी दोन मुले चाकू घेऊन पुढे आली. एकाने रविशवर चाकूचा वार केला व त्यांनी रविश व जयलक्ष्मी यांच्याकडून मोबाईल फोन व पैशाची पाकिटे लुबाडली. चोरटे निघून जाऊ लागले; तेव्हा रक्तबंबाळ रविशने त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यावर चोरट्यांपैकी एक जण पुन्हा मागे वळला व त्याने चाकूने रविशचा हात तोडला. चोरट्यांनी रविशच्या तोडलेल्या हातासह पोबारा केला.विशेष म्हणजे यावेळी रविशसोबत असलेली त्याची मैत्रीण स्वत: पोलीस आहे.नंतर इतर लोक व थोड्या वेळाने पोलीस आले व त्यांनी रविशला इस्पितळात दाखल केले. त्याच्या प्रकृतीचा धोका आता टळला असला तरी चोरटे व त्यांनी तोडून नेलेला रविशचा हात पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.
धक्कादायक! सशस्त्र चोरट्यांनी हातही तोडून नेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:28 IST