"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:56 IST2025-12-12T11:52:24+5:302025-12-12T11:56:00+5:30
Shivraj Patil Chakurkar: सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शिवराज पाटील यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले असं मोदींनी सांगितले.

"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं राजकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच शिवराज पाटील यांची भेट झाली होती असं सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की, शिवराज पाटीलजी यांच्या निधनाने दुःख झालं आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले. त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.
श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते… pic.twitter.com/aqQVerLnhn
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2025
"ज्येष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो"
तर शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणात पाऊल टाकले. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, संसदेच्या अनेकविध समित्यांचे सदस्य,आणि पुढे केंद्रातील विविध खात्यांचे मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकिर्द राहिली. लोकसभा सदस्य म्हणून ते सातवेळा निवडून आले होते. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना आवर्जून चालना दिली. चाकूरकर यांचा वकील म्हणून संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यातूनच त्यांनी लोकसभेतील संसदीय कार्य प्रणाली आणखी बळकट केली. तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकारण, समाजाकारणात सभ्यता, सुसंस्कृतता जपणारे, लोकशाहीवर गाढा विश्वास असणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना शिवराज पाटील यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.