"पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ढोल पिटले जात असताना कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प होऊन..."; शिवसेनेचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 07:39 AM2021-10-07T07:39:47+5:302021-10-07T07:40:20+5:30

Coal shortage in india : देशावर आता जे ‘ऊर्जा’ संकट घोंघावते आहे त्यासाठी केंद्र सरकार कोणाकडे अंगुलीनिर्देश करणार आहे?, शिवसेनेचा सवाल. 

shiv sena saamna editorial criticize government over coal shortage in india thermal power plants | "पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ढोल पिटले जात असताना कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प होऊन..."; शिवसेनेचा टीकेचा बाण

"पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ढोल पिटले जात असताना कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प होऊन..."; शिवसेनेचा टीकेचा बाण

googlenewsNext
ठळक मुद्देदेशावर आता जे ‘ऊर्जा’ संकट घोंघावते आहे त्यासाठी केंद्र सरकार कोणाकडे अंगुलीनिर्देश करणार आहे?, शिवसेनेचा सवाल. 

देशांतर्गत कोळसा उपलब्ध होण्यात अडथळे आणि परदेशी कोळशाच्या आयातीत वाढत्या किमतींचे विघ्न अशा कोंडीत देशातील वीजनिर्मिती सापडली आहे. ही कोंडी फोडण्याचे काम केंद्र सरकारचेच आहे. ती फुटली नाही म्हणूनच आज देशापुढे गंभीर वीजसंकट उभे ठाकले आहे. देश अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असं म्हणत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला.

‘पाच ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेचे ढोल पिटले जात असताना कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प होऊन हा ‘अंधार’ आणखी गडद होणार असेल तर हा बदलणाऱ्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?, असा सवालही शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून देशातील कोळशाच्या उपलब्धतेवर प्रश्न उपस्थित करत केंद्रावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा सिलसिलाही अशाच पद्धतीने सुरू आहे. नेहमीप्रमाणे त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीकडे बोट दाखविले जात आहे. वादासाठी ते एकवेळ मान्य केले तरी देशावर आता जे ‘ऊर्जा’ संकट घोंघावते आहे त्यासाठी केंद्र सरकार कोणाकडे अंगुलीनिर्देश करणार आहे? कोळशाची उपलब्धता कमी असल्याने देशातील वीज केंद्रांच्या कोळसा पुरवठय़ात अडथळे निर्माण झाले आहेत. केवळ चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा म्हणे उपलब्ध आहे. त्यामुळे उद्या संपूर्ण देश अंधारात बुडू शकतो.

औद्योगिक क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो. कोळशाचा पुरवठा कमी होण्यासाठी अनेक कारणे सांगितली जात आहेत. पुरामुळे खाणींमध्ये पाणी शिरल्याने उत्खनन बंद आहे. पर्जन्यवृष्टीने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. लॉक डाऊन शिथिल झाल्यामुळे कारखाने पूर्ववत सुरू झाले आहेत आणि त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यात आपली 75 टक्के वीजनिर्मिती आजही कोळशावर अवलंबून आहे. वीजनिर्मितीचे इतर स्रोत मर्यादितच आहेत. हे सर्व ठीक आहे, पण ही पळवाट होऊ शकत नाही. मुळात या अडचणींतून मार्ग काढणे आणि वीजनिर्मितीत अडथळा येणार नाही हे पाहणे केंद्राचेच कर्तव्य आहे. 

सरकार काय करत होते?
सरकारच्या संबंधित विभागांना कोळशाच्या कमी उपलब्धतेची आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱया वीजसंकटांची पूर्वकल्पना नसेल असे कसे म्हणता येईल? किंबहुना, ती आहे म्हणूनच सरकारी पातळीवर आता धावाधाव आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून वीज संकट टळले तर ठीकच आहे, पण पाणी नाकातोंडात जाईल एवढी गंभीर स्थिती होईपर्यंत केंद्र सरकार काय करीत होते, हा प्रश्न उरतोच. 

गणित सरकारी पातळीवर फसलेय
एका दिवसात नक्कीच उद्भवलेली नाही. त्यामुळे वेळीच योग्य पावले उचलली गेली असती तर आज वीजनिर्मितीवर जे प्रश्नचिन्ह लागले आहे ते लागले नसते. देशातील 135 औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांपैकी जवळजवळ 100 केंद्रांकडील कोळशाचा साठा खूप कमी शिल्लक आहे. 10-15 केंद्रांमध्ये दोन आठवडे पुरेल एवढाच कोळसा आहे. याचाच अर्थ विजेची वाढती मागणी, विजेचे उत्पादन, त्यासाठी लागणाऱ्या कोळशाची उपलब्धता, त्याच्या पुरवठय़ात आलेल्या अडचणी या सर्व अडथळय़ांतून मार्ग काढण्याचे गणित सरकारी पातळीवर कुठे तरी फसले आहे.

त्यामुळेच देशातील वीज केंद्रांकडे जेमतेम चार-पाच दिवसच पुरेल एवढाच कोळसा शिल्लक राहून देश अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशांतर्गत कोळसा उपलब्ध होण्यात अडथळे आणि परदेशी कोळशाच्या आयातीत वाढत्या किमतींचे विघ्न अशा कोंडीत देशातील वीजनिर्मिती सापडली आहे. ही कोंडी फोडण्याचे काम केंद्र सरकारचेच आहे. ती फुटली नाही म्हणूनच आज देशापुढे गंभीर वीजसंकट उभे ठाकले आहे. देश अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात असाही आपला देश सध्या सर्व बाजूंनी अंधारातच ढकलला जात आहे. कृषी कायदे आणि सरकारी दडपशाही या चरकात शेतकरी चिरडला जात आहे. ज्या लोकशाहीचे ढिंढोरे पिटले जातात त्या लोकशाहीचे भवितव्य अंधकारमय आहे. बेरोजगारी आणि गरिबीचा काळोख दूर होण्याची चिन्हे नाहीत. इंधन दरवाढ आणि महागाई यामुळे सामान्य जनतेच्या डोळय़ांसमोर अंधारी आली आहे. 

Web Title: shiv sena saamna editorial criticize government over coal shortage in india thermal power plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.