Shiv Sena leaders hold protest in Parliament premises on farmer issue | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन

नवी दिल्ली - केंद्रात सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यात यावी, तसेच राज्यातील अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेनाखासदारांना आज संसदेच्या आवारात आंदोलन केले.

संसद भवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेनाखासदारांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील आणि राज्यसभेतील खासदारांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, हेमंत गोडसे, राजन विचारे आदी उपस्थित होते.  

दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत शिवसेना खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला.

चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही नुकसान भरपाईची रक्कम कमी आहे. त्यामुळे त्या रकमेत वाढ करावी, तसेच महाराष्टात आलेले अवकाळी पावसाचे संकट दूर करावे, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली.

 

Web Title: Shiv Sena leaders hold protest in Parliament premises on farmer issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.