मुघल बादशाह औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली कबर ही सध्या देशपातळीवरील वादाचा विषय ठरली आहे. या कबरीवरून नागपूरमध्ये नुकताच तणाव निर्माण होऊन त्याचं पर्यावसान हिंसाचारात झालं होतं. दरम्यान, काही हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी आक्रमकपणे करत असतानाच औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला अडीच एकर जमीन आणि ११ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा शिवसेनेच्या नेत्याने केली आहे.
शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील नेते बिट्टू सिखेडा यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, जी व्यक्ती औरंगजेबाची कबर तोडेल त्या व्यक्तीला पाच बिघे जमीन (अडीच एकर) आणि ११ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल.दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारातील सर्व दोषी आरोपींवर आणि औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली. तसेच या आरोपींची रवानगी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये करावी, अशी मागणीही केली.
दरम्यान, गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात औरंगजेब बादशाहाने छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या यातनांचं चित्रिकरणं दाहकपणे समोर आणल्यानंतर सोशल मीडियातून औरंगजेबाबत संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि नेते खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा देत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी या कबर परिसरास कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दक्षता म्हणून खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबर परिसरात पोलीसांनी तसेच पुरातत्व विभागाने अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.