Shiv Sena indirectly warns congress leader rahul gandhi over his comment about savarkar | सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन शिवसेना आक्रमक; राहुल गांधींना सूचक इशारा
सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन शिवसेना आक्रमक; राहुल गांधींना सूचक इशारा

मुंबई: माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली आहे. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केल्यानं आता शिवसेनादेखील आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. झारखंडमध्ये निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर शरंसधान साधलं होतं. त्यावरुन काल संसदेत गदारोळ झाला. राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर आज दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना, मी मेलो तरीही माफी मागणार नाही. मी राहुल गांधी आहे, सावरकर नाही. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन शिवसेनेत नाराजी आहे. 

Web Title: Shiv Sena indirectly warns congress leader rahul gandhi over his comment about savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.