"तासभर भाषण करुन त्या थकल्या नाहीत"; पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:03 IST2025-01-31T16:48:23+5:302025-01-31T17:03:29+5:30

सोनिया गांधींच्या वक्तव्यावर राष्ट्रपती भवनातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

"She gave an hour-long speech..."; Rashtrapati Bhavan's response to Sonia Gandhi calling her a poor lady | "तासभर भाषण करुन त्या थकल्या नाहीत"; पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर

"तासभर भाषण करुन त्या थकल्या नाहीत"; पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर

Sonia Gandhi Statement : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त सभागृहासमोर अभिभाषण केलं. ४९ मिनिटांच्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी सरकारच्या यशाबद्दल आणि योजनांची रूपरेषेबद्दल माहिती दिली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर  काँग्रेस नेत्या आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. बिचाऱ्या राष्ट्रपती, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. सोनिया गांधी यांच्या या विधानावरुन भाजपने टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, सोनिया गांधींच्या वक्तव्यावर राष्ट्रपती भवनातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राष्ट्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रपती भवनाने सोनिया गांधी यांनी केलेले विधान दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. एका निवेदनात, राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांनी सोनिया गांधी यांच्या विधानावरुन टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यासाठी तासभर चाललेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  कुठेही थकल्या नव्हत्या, असं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे एका उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिप्पण्या दुर्दैवी असून पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत, असं राष्ट्रपती भवनाने म्हटलं.

"या वक्तव्यांमुळे राष्ट्रपती कार्यालयाची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे. भाषणादरम्यान, राष्ट्रपती कोणत्याही टप्प्यावर थकल्या नव्हत्या. खरंच, त्यांचा असा विश्वास होता की उपेक्षित समुदायांसाठी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे कधीही थकवणारे असू शकत नाही," असे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. कोणाचेही नाव न घेता, काही नेत्यांनी चुकीचे विधान केले आहे कारण त्यांना हिंदीसारख्या भारतीय भाषांमधील वाक्प्रचार माहित नसतील, असंही निवेदनात म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख केला होता. "त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, शेवटी बोलू शकत नव्हत्या. बिचाऱ्या महिला राष्ट्रपती," असं सोनिया गांधी म्हणाल्या. दुसरीकडे, राहुल गांधी यांनीही राष्ट्रपतींच्या भाषणावर प्रतिक्रिया देत ते कंटाळवाणे असल्याचे म्हटलं. राष्ट्रपतींचे भाषण अत्यंत कंटाळवाणे होते आणि त्यात नवीन काहीच नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
 

Web Title: "She gave an hour-long speech..."; Rashtrapati Bhavan's response to Sonia Gandhi calling her a poor lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.