एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा एक प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. तब्बल १७ वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या एका हत्तीणीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, आता ही हत्तीण गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. गाझियाबाद पोलीस आता या हत्तीणीला ताब्यात घेण्यासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
नेमकं प्रकरण काय?
गाझियाबादमधील असालतपूर येथे राहणारे गय्यूर अली यांनी सन २००० मध्ये बिहारच्या प्रसिद्ध सोनपूर मेळाव्यातून २.५० लाख रुपये खर्च करून एक हत्तीण खरेदी केली होती. मात्र, १ जानेवारी २००८ रोजी या हत्तीणीला तिची देखभाल करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी चोरून नेले. लक्ष्मण आणि लक्की (रा. जम्मू-काश्मीर) अशी या आरोपींची नावे आहेत. या चोरीनंतर गय्यूर अली यांनी पोलिसांकडे धाव घेतली, मात्र सुरुवातीला त्यांना फारशी मदत मिळाली नाही.
मालकाची जिद्द आणि १७ वर्षांचा लढा
आपली हत्तीण परत मिळवण्यासाठी गय्यूर अली यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः अनेक राज्यांमध्ये तिचा शोध घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना ही हत्तीण जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे कळाले होते, मात्र तिथे गेल्यावर त्यांना धमकावून पळवून लावण्यात आले. अखेर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ऑक्टोबर २०२२ पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर, सप्टेंबर २०२५ मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आता गुजरात कनेक्शन आले समोर
एसीपी अतुल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. तांत्रिक माहिती आणि तपासाअंती ही हत्तीण सध्या गुजरात राज्यातील एका मोठ्या उद्यानात असल्याचे निष्पन्न झाले आहे. गय्यूर अली यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
पोलीस पथक गुजरातला रवाना होणार
गाझियाबाद पोलिसांनी आता ही हत्तीण हस्तगत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तपासासाठी आणि हत्तीणीला परत आणण्यासाठी उच्चाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच पोलिसांचे एक विशेष पथक गुजरातला रवाना होईल. १७ वर्षांनंतर एखादा प्राणी अशा प्रकारे पुन्हा मूळ मालकाकडे परतण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
Web Summary : Seventeen years after being stolen, an elephant from Ghaziabad was found in Gujarat. The owner, after a long legal battle, will finally be reunited with his elephant. Police are heading to Gujarat to bring her back.
Web Summary : गाजियाबाद से 17 साल पहले चोरी हुई हथिनी गुजरात में मिली। मालिक की लंबी कानूनी लड़ाई के बाद आखिरकार हथिनी से पुनर्मिलन होगा। पुलिस उसे वापस लाने के लिए गुजरात जा रही है।