शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनंतर शशी थरुर यांचाही राजीनामा; टीव्ही शो सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:13 IST2021-12-06T15:10:26+5:302021-12-06T15:13:14+5:30

तोपर्यंत टीव्ही शो होस्ट करणार नाही; काँग्रेस खासदार शशी थरुर यांचा राजीनामा

Shashi Tharoor steps down as host of Sansad TV show in solidarity with suspended MPs | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनंतर शशी थरुर यांचाही राजीनामा; टीव्ही शो सोडला

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनंतर शशी थरुर यांचाही राजीनामा; टीव्ही शो सोडला

नवी दिल्ली: शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यानंतर आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीदेखील सांसद टीव्हीचा कार्यक्रम सोडला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत थरुर यांनी सांसद टीव्हीवरील कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

जोपर्यंत १२ खासदारांचं निलंबन मागे घेतलं जात नाही, तोपर्यंत शो होस्ट करणार नाही, अशी भूमिका शशी थरुर यांनी घेतली आहे. लोकसभेत थिरुअनंतपुरम मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असलेले थरुर सांसद टीव्हीवर 'टू द पॉईंट' कार्यक्रम होस्ट करतात.

'एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी संसद टीव्हीचं निमंत्रण स्वीकारणं लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरांपैकी एक होतं. आमच्यामध्ये राजकीय मतभेद असले तरीही संसदेचे सदस्य म्हणून विविध संसदीय संस्थांमध्ये सहभागी होण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही हेच यातून दिसलं. निलंबित खासदार करत असलेल्या आंदोलनाला पाठिबा म्हणून टू द पॉईंट कार्यक्रम सोडत आहे,' असं थरुर म्हणाले. खासदारांचं निलंबन मागे घेतल्यास कार्यक्रमात पुन्हा सहभागी होईन. जोपर्यंत निलंबन रद्द होत नाही, तोपर्यंत कार्यक्रम करणार नाही, असं थरुर यांनी सांगितलं.

सेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल दिला राजीनामा
राज्यसभेत गदारोळ केल्यानं १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, तृणमूल आणि डाव्या पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर चतुर्वेदींनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. गुन्हेगारांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळते. पण आम्हाला तीदेखील मिळाली नाही, अशा शब्दांत चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली. 

चतुर्वेदींचं उपराष्ट्रपतींना पत्र
आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. चतुर्वेदी सांसद टीव्हीच्या अँकर आहेत. राज्यसभेतून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी अँकरपदाचा राजीनामा दिला आहे. 'सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी पायउतार होत आहे. संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दलदेखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे,' असं चतुर्वेदींनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

Web Title: Shashi Tharoor steps down as host of Sansad TV show in solidarity with suspended MPs