Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाल्यामुळे अनेक विरोधी नेते सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते तर 1971चे युद्ध आणि आताच्या संघर्षाची तुलना करत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. या दरम्यान काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मात्र संतुलित भूमिका घेतली आहे.
1971 आणि आताची परिस्थिती वेगळीमीडियाशी संवाद साधताना शशी थरुर म्हणाले की, '1971 आणि 2025 ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सध्या भारतासाठी शांतता आणि स्थैर्य हे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. यावेळी भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कारवाई केली होती, जी आता पूर्ण झाली आहे. आता उगीच युद्ध चालू ठेवण्यात अर्थ नाही. भारताने आपल्या आर्थिक प्रगतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करावे आणि दीर्घकालीन युद्धात अडकू नये.'
थरुर पुढे म्हणतात, '1971 च्या युद्धाचे एक नैतिक उद्दिष्ट होते. ते युद्ध बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढले गेले होते. त्यावेळी भारत नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. आज परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानची लष्करी भूमिका, तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक विचारसरणी बदलली आहे. आता पाकिस्तानसोबत दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवले, तर दोन्ही बाजूने मोठी जीवित आणि वित्तहानी होईल. आजच्या भारताला फक्त सूड हवा नाही तर स्थिरता हवी आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.