“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:54 IST2025-12-05T17:50:02+5:302025-12-05T17:54:25+5:30
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj News: धार्मिक गोष्टींसाठी मंदिरे तोडण्यात आलेली नाहीत, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला.

“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj News: मशीद बांधत असतील तर त्याला आक्षेप नाही. मशीद बांधून तिथे ईश्वराची आराधना आपापल्या पद्धतीने करा. यात आम्ही आजपर्यंत आक्षेप घेतला नाही आणि भविष्यातही घेऊ असे वाटत नाही. परंतु, कोणी बाबरचे नाव घेऊन, त्याला समर्थन देत असेल, तर मात्र त्याच पद्धतीने त्याच्याशी व्यवहार केला जाईल. बाबर आक्रमणकर्ता होता, त्याला आजही आक्रमणकर्ताच मानतो. भारतावर आक्रमण करून बाबरने इथल्या लोकांवर अत्याचार केले. जर कोणी स्वतःला बाबरशी संबंधित असल्याचे सांगितले तर आम्ही त्यांनाही आक्रमणकर्ताच मानू आणि त्यालाही त्यानुसार वागणूक दिली जाईल, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी स्पष्ट केले. टीएमसी आमदार हुमायू कबीर यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.
प्रसार माध्यमांशी बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले की, मथुरा आणि काशी येथे सुरक्षा वाढवण्याची गरज काय आहे. ज्यांचा त्यावर हक्क आहे, त्यांना ते उपलब्ध झाले पाहिजे. तिथे पूजन, धार्मिक विधी झाले पाहिजेत. विश्व कल्याणासाठी प्रार्थना करावी. संपूर्ण विश्वाच्या संकल्पनेत तेही लोक येतात. जे त्या ठिकाणी कब्जा करून बसलेत, त्यांचेही यातून कल्याण होईल. जे कब्जा करून बसलेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, एकेकाळी राजकारण करण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्या. धार्मिक गोष्टींसाठी मंदिरे तोडण्यात आलेली नाहीत, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला.
आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत करू
इस्लाम कधी असे सांगत नाही की, दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करून तिथे आपली उपासना स्थळे बांधावीत. ही गोष्ट इस्लाममध्ये योग्य मानली गेलेली नाही. परंतु, असे करण्यात आले, ते धार्मिक कारणांसाठी नाही, तर राजकीय कारणांसाठी करण्यात आले. आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत करू, अशी भावना मनात ठेवून हे सगळे करण्यात आले. जी बाब राजकीय कारणांमुळे झाली, त्याला धार्मिक रंग का देण्यात येत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात अजूनही तेच राजकारण आहे. मुस्लीम समाजाने एकत्र बसून या गोष्टीवर विचार करायला हवा की, माझ्या धर्मात काय योग्य सांगितले गेले आहे. परंतु, दुसऱ्या धर्माचे प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करूनच तुमचा ईश्वर तुमची उपासना कबूल करून घेतो, असे जर त्यांचा धर्म सांगत असेल, तर मग काय बोलणार, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले.
दरम्यान, त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत, ते पाहिल्यास त्यात असे आढळून आले की, दुसऱ्यांचे प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करून तिथे तुम्ही तुमचे काही बांधले आणि उपासना केली, तर अशी प्रार्थना त्यांच्या ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. असे असेल तर दररोज याबाबत तुम्ही का एकत्रित येऊन बिनकामाची मेहनत करता. तुमची प्रार्थना स्वीकारलीच जाणार नसेल, तर तिथे जाऊन उपासना करण्यात काय अर्थ आहे. त्या काळातील राजकीय परिस्थिती वेगळी होती, आजही परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे अशा गोष्टींवर भर देण्यात काही अर्थ नाही, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.
#WATCH | Haridwar, Uttarakhand | On TMC MLA Humayun Kabir's announcement to build a Babri Masjid, Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj says, "... Babar was an invader, and he has committed grave atrocities. If anyone identifies themself as related to Babar,… pic.twitter.com/ga26C03PSe
— ANI (@ANI) December 5, 2025