संसदभवन परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या धक्का-बुक्की प्रकरणावर भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रनौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना लज्जास्पद असून आमचे खासदार जखमी झाले आहेत.
खरे तर, संसद परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास धक्का-बुक्कीदरम्यान ओडिशातील बालासोरचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत. भाजप खासदार सारंगी यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कंगना यांनी भाष्य केले आहे.
त्यांच्या प्रत्येक खोट्या गोष्टीचा बुरखा फाटला - कंगनाप्रसारमाध्यमांशी बोलताना कंगना म्हणाल्या, "ही एक लज्जास्पद घटना आहे. आमच्या खासदाराला दुखापत झाली असून रक्तस्त्रावही झाला आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर किंवा संविधानासंदर्भात त्यांनी (काँग्रेस) ज्या खोट्या गोष्टी पसरवल्या आहेत, त्या दरवेळी उघड पडल्या आहेत. आता त्यांची हिंसाचार आणि क्रौर्य संसद भवनापर्यंत पोहोचले आहे. आज त्यांनी आमच्या खासदाराला धक्का दिला आहे."
"मी राहुल गांधींना ओळखतो" -कंगना व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही धक्का-बुक्की प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी राहुल गांधींना ओळखतो. ते खासदारच काय, पण कुणालाही धक्का देणार नाही. कुणाच्याही प्रति असभ्य अथवा वाईट व्यवहार करणे त्यांच्या स्वभावात नाही.