पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:43 IST2025-06-03T13:42:42+5:302025-06-03T13:43:03+5:30
Shakur Khan : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शकूर खान राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शकूर खान राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे. संशयास्पद हालचाली दिसल्याने सुरखस यंत्रणा त्याच्यावर नजर ठेवून होत्या. तापसादरम्यान समोर आलं की, शकूर हा पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या दानिश आणि सोहेल कमर याच्या संपर्कात होता. इतकंच नाही तर त्याने अनेकदा पाकिस्तानी दूतावासाच्या चकरा मारल्या होत्या.
पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असलेल्या दानिशच्या मदतीने शकूर खानने पाकिस्तानच्या व्हिसावर अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात असताना, शकूरने आयएसआय एजंट्सशी संपर्क साधल्याचा आणि व्हॉट्सअॅपद्वारे महत्त्वाची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.
#WATCH | Jaipur, Rajasthan | Govt employee Shakur Khan, arrested on allegations of spying, remanded to seven-day police custody pic.twitter.com/a1yoW4PciL
— ANI (@ANI) June 3, 2025
सीमेपलीकडील लोकांशी संपर्क
शकूर खानकडे इस्लामाबादमधील काही लोकांचे फोन नंबर असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे तो सीमेपलीकडील लोकांशी संवाद साधत होता, आणि त्यांच्याशी महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असल्याचा संशय आहे. सीमेपलीकडील लोकांना तो देशाची संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे.
माजी मंत्र्यांशी संबंध
शकूर खान जिल्हा रोजगार कार्यालयात नोकरी करतो, तसेच तो माजी काँग्रेस मंत्री सालेह मोहम्मद यांचा स्वीय सहाय्यक होता. सालेह मोहम्मद यांच्या मूळ गाव भागूपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडोदा गावातील मंगलियाओं धानी या गावात शकूरचे कुटुंब राहते.
माजी काँग्रेस मंत्र्यांशी असलेले कनेक्शन समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना देशभक्ती दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "मंत्र्यांच्या सहाय्यकाला गुप्त माहिती मिळवण्याची संधी मिळलीच असेल. जर ती माहिती त्याने शत्रू देशाला दिली असेल, तर ही चिंतेची बाब आहे."