हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! रक्षाबंधनच्या दिवशी एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:22 IST2023-08-30T16:21:36+5:302023-08-30T16:22:11+5:30
बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला.

हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! रक्षाबंधनच्या दिवशी एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला
Bihar Rohtas Accident : बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. सकाळी झालेल्या या रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. स्कॉर्पिओमधून प्रवास करणारे प्रवाशी कैमूर जिल्ह्यातील कुडारी गावचे रहिवासी होते. त्याचवेळी या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. आपल्या मूळ गावी परतत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातला.
दरम्यान, स्कॉर्पिओमध्ये एकूण १२ जण होते. चालकाला झोप लागल्याने स्कॉर्पिओ मागून महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली, असे सांगण्यात येत आहे. स्थानिक शिवसागर पोलिसांनी या सात जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असून दोन मुले देखील दगावली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घाला
बिहारला हादरवरणारी ही घटना शिवसागर येथील पाखनारीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्कॉर्पिओ गाडीचा चाकाचुरा झाला. अपघातानंतर एकच खळबळ माजली. सर्व मृत प्रवाशी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो बोधगया येथे फिरायला गेले होते. तिथून १२ जण गावी परतत असताना हा अपघात झाला. मृत प्रवाशी एकाच कुटुंबातील आहेत. पाच जणांवर उपचार सुरू आहेत.