भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 21:54 IST2025-04-29T21:53:33+5:302025-04-29T21:54:13+5:30
Randeep Surjewala News: गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वादग्रस्त विधानं होत असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा आणि अतिरेक्यांचे जवळचे संबंध असून, जेव्हा भाजपा सत्तेत असतो तेव्हाच असे हल्ले होतात, असा दावा त्यांनी केला आहे.

भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. एकीकडे देशात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वादग्रस्त विधानं होत असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा आणि अतिरेक्यांचे जवळचे संबंध असून, जेव्हा भाजपा सत्तेत असतो तेव्हाच असे हल्ले होतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच जेव्हा भाजपा सत्तेत असतो तेव्हाच असे हल्ले का होतात असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोक विचारत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
भाजपावर गंभीर आरोप करताना रणदीप सुरजेवाला म्हणाले जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आयसी ८१४ या विमानाचं अपहरण केलं होतं, तेव्हा मौलाना मसूद अझहर आणि इतर दहशतवाद्यांना काश्मीरमधील तुरुंगातून सोडवून तेव्हाच्या भाजपा सरकारमधील परराष्ट्रमंत्री कंधाहारला सोडून आले होते, यावर भाजपा नेते काय उत्तर देणार. जेव्हा देशात भाजपाचं सरकार होतं, तेव्हा ते एवढं कमकुवत होतं की, देशाच्या संसदेवरही हल्ला झाला होता.
जेव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. केवळ हवाई तळच नाही तर आमचं पोलीस ठाणंही उडवलं. उरीमध्ये लष्करी तळावर हल्ला झाला, तेव्हाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होते. पुलवामामध्ये थेट हल्ला झाला होता. तेव्हा आमच्या लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केलं गेलं, हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान चित्रपटाचं चित्रिकरण करत होते. त्याशिवाय नगरोटा येथील लष्करी तळ, अमरनाथ यात्रा आणि रियासी येथेही अशाच प्रकारचे हल्ले झाले, तर आता पहलगाम येथे हल्ला झाला.
रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे मागच्या ७५ वर्षांतील पहिले असे पंतप्रधान आहेत. जे न बोलावता पाकिस्तानमध्ये न बोलावता मेजवानीसाठी गेले. त्या बदल्यात आपल्याला पाकिस्तानकडून पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला भेट म्हणून मिळाला. मागच्या ७५ वर्षांत भाजपा असा एकमेव पक्ष आहे, ज्याने पाकिस्तानच्या कुख्यात आणि बदनाम आयएसआयला भारतात बोलावलं होतं. तेव्हाही अमित शाह गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होते. एकदा नाही तर अनेकदा भाजपा आणि आयएसआयचे संबंध असल्याचे समोर आले आहे, असा दावाही त्यांनी केला.