भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांच्या सुरक्षेतील NSG कमांडोसह दोघांचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 14:44 IST2021-11-06T14:44:05+5:302021-11-06T14:44:12+5:30
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधा तक्रार दाखल करुन शोध सुरू केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांच्या सुरक्षेतील NSG कमांडोसह दोघांचा अपघातात मृत्यू
चायबासा:भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या संरक्षणाखाली तैनात असलेले एनएसजी कमांडो पोरेस बिरुली आणि त्यांच्या मामाचा मुलगा राजा तिऊ यांचा दिवाळीच्या रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, एनएसजी कमांडो पोरेस बिरुली गुरुवारी संध्याकाळी पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील त्यांच्या घरी सुट्टीसाठी आले होते. घरी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात ते आपल्या मामाचा मुलगा राजा तिऊ याच्यासोबत मोटारसायकलवरून जात होते.
रात्री दहाच्या सुमारास घरी परतत असताना चाईबासा व टाटा मुख्य रस्त्यावरील ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार दोघेही जागीच ठार झालेल. पोरेश बिरुली हा झिकपाणीच्या सोनापोसी गावचा रहिवासी होता. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. पोरेशची पत्नी झारखंड स्टेट लाइव्हलीहुड प्रमोशन सोसायटीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
चाईबासा सदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) दिलीप खालको यांनी सांगितले की, त्यांच्या मोटारसायकलला रेल्वे ओव्हरकमिंग ब्रिजवर भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात बिरुली यांचा जागीच मृत्यू झाला. बिरुली हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सुरक्षेतील कमांडो होते आणि ते दिवाळी साजरी करण्यासाठी तीन दिवसांच्या रजेवर घरी आले होते. सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, मोटारसायकलला धडक देणारे वाहन आणि त्यामधील लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.