Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:59 IST2025-05-11T17:58:37+5:302025-05-11T17:59:30+5:30
Seema Haider : सीमा हैदरची बहीण रीमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती ढसाढसा रडत आहे आणि सीमाला घरी परत येण्याचं आवाहन करत आहे.

Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना सीमा हैदर देखील चर्चेत आली होती. लोक तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी करत आहेत. याच दरम्यान आता सीमा हैदरची बहीण रीमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती ढसाढसा रडत आहे आणि सीमाला घरी परत येण्याचं आवाहन करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा उल्लेख करताना ती म्हणाली की, सीमा हैदर आणि तिची मुलं भारतात सुरक्षित नाहीत. म्हणून त्यांनी ताबडतोब पाकिस्तानात यावं. हा व्हिडीओ सीमा हैदरचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने पोस्ट केला आहे.
बुरखा घातलेली एक महिला व्हिडिओमध्ये रडत रडत सीमाला परत येण्याची विनंती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की ही महिला सीमा हैदरची बहीण रीमा आहे. "सीमा, तू कधीतरी तुझ्या कुटुंबातील सदस्यांवर प्रेम केलं असशीलच. तिथली परिस्थिती सुरक्षित नाही. जर भारतातील लोक तुला पाठवू इच्छितात तर तुला का यायचं नाही? तुझी मुलं सुरक्षित नाहीत. तू परत ये. तुला कोणीही मारणार नाही. तू गुलाम हैदर भाईंची पत्नी आहेस. ते तुला माफ करतील. तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही."
"मोदीजी आणि योगीजी आमची मदत करा"
"मी मोदीजी आणि योगीजी यांना आमची मदत करा असं सांगू इच्छिते. जर व्हिसा असलेल्या लोकांचा व्हिसा रद्द करून त्यांना परत पाठवू शकता, तर ते सीमाला का पाठवू शकत नाहीत? तिचे तिथे कोणी नातेवाईकही नाहीत. ती चार मुलांना बेकायदेशीरपणे घेऊन गेली आहे. तिचा तलाक झालेला नाही. ती खोटे बोलत आहे. सीमाला खोटं बोलायला शिकवण्यात आलं आणि जर ती तिथे गेली तर तिला मारले जाईल अशी धमकी देण्यात आली होती. कृपया आम्हाला मदत करा."
"तुला आमची आठवण येत नाही का?"
"तुला आमची आठवण येत नाही का? मला रात्री झोप येत नाही. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट येते की माझी बहीण आणि मुलं कोणत्या परिस्थितीत असतील? मला माहित आहे की तू चूक केली आहेस, पण तू माफी मागू शकतेस. हैदर तुला मारणार नाहीच. सीमा खोटं बोलत आहे की तिचा आणि गुलाम हैदरचा तलाक झाला आहे. तलाक झालेला नाही. तिला खोटं बोलायला लावलं जात आहे" असं रीमाने म्हटलं आहे. सीमा हैदर पाकिस्तानहून नेपाळमार्गे भारतात आली होती आणि सध्या ती नोएगा येथील सचिन मीनाच्या घरी राहत आहे.