अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेला सुरुंग, मंदिर परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्ती ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:35 IST2026-01-10T18:35:09+5:302026-01-10T18:35:34+5:30
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अयोध्या हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावत एका व्यक्तीने राम मंदिराच्या परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेला सुरुंग, मंदिर परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्ती ताब्यात
अयोध्येतील राम मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अयोध्या हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावत एका व्यक्तीने राम मंदिराच्या परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा दलांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून, तो काश्मिरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने राम मंदिराच्या परिसरातील दक्षिण भागात असलेल्या सीता की रसोई जवळ नमाज पढण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीने काश्मिरी वेषभूषा परिधान केलेली होती. तसेच तो राम मंदिरातील गेट डी-१ येथून मंदिरात आला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव अबू अहमद शेख असं असून, तो काश्मीरमधील शोपियाँ येथील रहिवासी आहे.
ही घटना आज सकाळी घडली असून, या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्षदर्शी आणि सूत्रांनी सांगितले की, जेव्हा सुरक्षा रक्षकांनी अडवले तेव्हा या व्यक्तीने धार्मिक घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. या प्रकरणी सदर व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.