अश्लील व्हिडिओ, नपुंसक अन् २० कोटींचा हुंडा; दंडाधिकारी पती-पत्नीचा वाद चव्हाट्यावर, एकमेकांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:42 IST2026-03-23T12:32:53+5:302026-03-23T12:42:00+5:30
उत्तर प्रदेशात दोन दंडाधिकारी पती-पत्नीमधील वाद चव्हाट्यावर आला असून हुंड्याचा आरोपसुद्धा करण्यात आली आहे.

अश्लील व्हिडिओ, नपुंसक अन् २० कोटींचा हुंडा; दंडाधिकारी पती-पत्नीचा वाद चव्हाट्यावर, एकमेकांविरोधात तक्रार
UP SDM Allegation:उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात तैनात असलेल्या दोन उच्चपदस्थ उपविभागीय दंडाधिकारी पती-पत्नीमधील घरगुती भांडणाने आता कायदेशीर वादाचे रूप धारण केले आहे. एसडीएम दिव्या ओझा यांनी पती एसडीएम अनुपम मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध हुंडाबळी, शारीरिक छळ आणि गंभीर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, दिव्या यांनी आपल्या पतीवर जन्मजात नपुंसक असल्याचा आणि २० कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
दोघेही एकाच जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी
दिव्या ओझा (२०१७ बॅच) आणि अनुपम मिश्रा (२०१९ बॅच) हे दोघेही पीसीएस अधिकारी आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दोघेही सध्या चंदौली जिल्ह्यातच कार्यरत आहेत. अनुपम हे पीडीडीयू नगर येथे तैनात आहेत, तर दिव्या या चंदौली सदरमध्ये एसडीएम म्हणून कार्यभार पाहत आहेत. २०२० मध्ये या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता, मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.
२० कोटींचा हुंडा आणि अश्लील व्हिडिओचा धाक
दिव्या यांचे वडील निशाकांत ओझा यांनी प्रतापगडच्या महिला ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला २० कोटींची मागणी करण्यात आली होती, जी नंतर ५ कोटींवर आली. लग्न वाचवण्यासाठी दिव्याच्या वडिलांनी ३८ लाख रोख, ४० लाखांचे दागिने आणि ७ लाखांचे सामान दिले होते. अनुपम हे जन्मजात नपुंसक असून ही बाब लपवून त्यांनी लग्न केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करणे, करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे आणि तंत्र-मंत्राचा वापर करून मानसिक छळ केल्याचेही आरोप लावले आहेत.
जीवे मारण्याचा प्रयत्न
तक्रारीनुसार, ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री २ वाजता दिव्या यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याआधीही सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांना बेदम मारहाण झाल्याचा आरोप आहे. वारंवार स्थानिक प्रशासनाकडे दाद मागूनही कारवाई न झाल्याने अखेर प्रतापगड पोलिसांत धाव घ्यावी लागल्याचे वडिलांनी सांगितले.
सासूनेही केली तक्रार
दुसरीकडे, हा वाद केवळ एकतर्फी राहिलेला नाही. एसडीएम अनुपम मिश्रा यांच्या आईनेही चंदौलीच्या अलीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सून दिव्या आणि त्यांच्या माहेरच्या मंडळींनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सासू विरुद्ध सून आणि पती विरुद्ध पत्नी अशा पेचात अडकले आहे.
पोलीस कारवाई आणि तपास
प्रतापगड पोलिसांनी अनुपम मिश्रा, त्यांचे वडील प्रमोद मिश्रा, आई शशी आणि दोन बहिणींविरुद्ध हुंडा छळ, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन बड्या अधिकाऱ्यांमधील हा वाद सध्या उत्तर प्रदेशातील प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.