पत्नीला वाचवण्यासाठी गेला अन् परतला नाही... रुग्णालयातून घरी जाणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:48 IST2025-09-09T19:42:15+5:302025-09-09T19:48:30+5:30
गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात झालेल्या अपघातात पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पत्नीला वाचवण्यासाठी गेला अन् परतला नाही... रुग्णालयातून घरी जाणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू
Gujarat Accident: गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी गुजरातमधील अहमदाबाद शहरात मुसळधार पावसात एक मोठा अपघात घडला.रस्त्यावर भरलेल्या पाण्यात अडकल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेचे हृदयद्रावक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आधी महिलेला विजेचा धक्का बसला आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पतीलाही विजेचा धक्का बसला.
पावसामुळे रस्ता पाण्याने भरला होता. दरम्यान, हे जोडपे त्यांची अॅक्टिव्हा ओढत रस्ता ओलांडत होते. पण अचानक पाण्यात करंट आला, ज्यामुळे आधी पत्नी पाण्यात अडकली आणि नंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीलाही जोरदार विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
नारोळ पोलीस ठाण्याच्या जवळील रुद्र ग्रीन सोसायटीमध्ये राहणारे हे जोडपे त्यांच्या नातेवाईकाला भेटून एलजी हॉस्पिटलमधून परतत होते. मटन गली रोडवर पोहोचताच त्यांची दुचाकी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अडकली आणि दोघेही खाली पडले. दरम्यान महिलेचा पाण्यात वाहणाऱ्या करंटशी संपर्क आला आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही धक्का बसला.
अग्निशमन दल आणि वीज विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर, राजन सिंघल आणि त्यांची पत्नी अंकिता सिंघल यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.