कोर्टाची परवानगी घेऊन संजय सिंह राज्यसभेत; पण सभापतींकडून खासदारकीच्या शपथेला नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 02:22 PM2024-02-05T14:22:15+5:302024-02-05T14:23:20+5:30

कोर्टाकडून संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी राज्यसभेत हजर होण्याची परवानगी देण्यात आली होती.

Sanjay Singh in Rajya Sabha with court permission But the chairman refused to give the oath | कोर्टाची परवानगी घेऊन संजय सिंह राज्यसभेत; पण सभापतींकडून खासदारकीच्या शपथेला नकार, कारण...

कोर्टाची परवानगी घेऊन संजय सिंह राज्यसभेत; पण सभापतींकडून खासदारकीच्या शपथेला नकार, कारण...

AAP Sanjay Singh ( Marathi News ) : कोर्टाकडून परवानगी घेऊन राज्यसभेत पोहोचलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेता आली नाही. कारण राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तुमचं प्रकरण सध्या विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित असल्याचं सांगत सिंह यांना खासदार म्हणून शपथ घेण्यास परवानगी नाकारली.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात ईडीकडून आप नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. मात्र राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी आणि संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपल्याला जामीन मिळावा, अशी याचिका सिंह यांनी कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाकडून संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी राज्यसभेत हजर होण्याची परवानगी देण्यात आली. मात्र संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठीची मागणी फेटाळून लावण्यात आली होती.

काय आहेत संजय सिंह यांच्यावर आरोप?

ईडीने आपल्या आरोपपत्रात मद्य घोटाळ्यातील अन्य आरोपी दिनेश अरोरा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा आरोप केला होता. या बैठकीला संजय सिंह उपस्थित होते. दिनेश अरोरा यांनी ईडीसमोर दिलेल्या कबुली जबाबानुसार, संजय सिंह यांची पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेट झाली. यानंतर ते मनिष सिसोदिया यांच्या संपर्कात आले. दिल्ली निवडणुकीपूर्वी आप नेत्यांनी मिळून केलेला हा निधी उभारणीचा कार्यक्रम होता, असा मोठा आरोप करण्यात आला आहे. 

"दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण संजय सिंह यांनी परस्पर मिटवले"

ईडीच्या आरोपपत्रानुसार, संजय सिंह यांच्या सांगण्यावरून, दिनेश अरोरा यांनी दिल्लीतील निवडणुकांसाठी पक्षनिधी गोळा करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली. एवढेच नाही तर ३२ लाखांचा धनादेशही मनिष सिसोदिया यांच्याकडे सुपूर्द केला. उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित असलेले दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण संजय सिंह यांनी सोडवल्याचा आरोप ईडीने केल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय सिंह यांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते. यानंतर संजय सिंह यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात तपास यंत्रणांनी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली. 


 

Web Title: Sanjay Singh in Rajya Sabha with court permission But the chairman refused to give the oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.