संघाची संघटना म्हणते ताजमहाल महिलांच्या अपमानाचे प्रतीक, पण कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 21:33 IST2017-10-26T21:30:53+5:302017-10-26T21:33:19+5:30
भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे.

संघाची संघटना म्हणते ताजमहाल महिलांच्या अपमानाचे प्रतीक, पण कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
नवी दिल्ली - जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालवरून सध्या वाद पेटला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ताजमहाल हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. मात्र कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास ताजमहाल हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे.
अखिल भारतीय इतिहास संघटन योजनेचे संघटना सचिव बालमुकुंद म्हणाले, ताजमहाल हा आमचा ठेवा आहे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे. कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास ताजमहाल हा आमच्या देशाचा गौरव आहे. जगभरातून त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक येतात. हजारो भारतीय कलाकारांच्या कलेचे त्यातून प्रदर्शन होते. तो आपला ठेवा आहे आणि जर कुणी तसे मानत नसेल तर ते चुकीचे आहे."
मात्र कलेचे प्रतीक असला तरी ताजमहाल हा प्रेमाचे प्रतीक मानता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ताजमहाल प्रेमाचे प्रतीक असू शकत नाही कारण एखाद्या महिलेच्या पतीला मारणे, त्यानंतर तिला रखैल म्हणून ठेवणे, पुढे 17 वर्षांत 14 अपत्ये जन्माला घालणे आणि शेवटी 14 व्या अपत्याच्या जन्मावेळी त्या महिलेचा मृत्यू होणे. त्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीशी विवाह करणे, हे भारतीय संस्कृतीनुसार प्रेम ठरू शकत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या हा महिलेचा अपमान आहे. पण कलेचा नमुना म्हणून ताजमहालचा अभिमानच असला पाहिजे.
जगभरातल्या करोडो पर्यटकांची पसंती असलेला ताजमहाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय इतिहासातला कलंक आहे, असे उद्गार काढले. तर भाजपाचे नेते विनय कटियार यांनी ताजमहाल हे मुळचे शिवमंदीर असून त्याचे नाव तेजोमहाल होते असा दावा केला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे. तर, काही पुरातत्व तज्ज्ञांनी ताजमहालच्या खाली हजारो खोल्या असल्याचा दावा केला आहे. ताजमहालच्या बाबतीत अनेक बाबी जाणुनबुजून गुप्त ठेवण्यात आल्याचा दावा करणारा व ताजमहाल जेवढा वर आहे, तितकंच बांधकाम त्याच्याखाली आहे असे सांगणारा एक व्हिडीयो सध्याप्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रत्येक देशातील ऐतिहासिक वास्तूमागे कितीतरी इतिहास लपलेला असतो. हा इतिहास रोमांचकारी असतो तर कधीकधी थक्क करणारा असतो. पण एखाद्या ऐतिहासिक वास्तूमागील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असं नाही. कधी-कधी राजकीय नेते या गोष्टी सामान्य माणसांपासून मुद्दामहून लपवतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचपैकी एक वास्तू म्हणजे भारताची शान असलेला ताजमहल. काही जणांचा दावा आहे की ताजमहलबाबतही अशा काही गोष्टी आहेत ज्याविषयी मुद्दाम गुप्तता पाळली गेली आहे.