सनातनचा नेमका अर्थ काय, हिंदू शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:06 IST2023-09-07T17:06:18+5:302023-09-07T17:06:25+5:30
Sanatan Dharma Controversy: तामिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे.

सनातनचा नेमका अर्थ काय, हिंदू शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला? जाणून घ्या...
Sanatan Dharma Controversy:तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे संपूत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. डीएमके नेते ए राजा यांनीही सनातनची तुलना एचआयव्ही सारख्या विषाणूशी केल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे. या विधानांना भाजप नेत्यांकडून जोरदार विरोध केला जातोय. दरम्यान, ज्या सनातन शब्दावरुन वाद सुरू झाला आहे, त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याची उत्पत्ती कधी झाली, हे जाणून घेऊ...
सनातन धर्म हजारो वर्षे जुना
सनातन धर्माला हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म असेही म्हणतात. हा जगातील सर्वात जुना धर्म म्हणून ओळखला जातो. भारतातील सिंधू संस्कृतीत सनातन धर्माची अनेक चिन्हे आढळतात. हा धर्म किती जुना आहे, या प्रश्नाकडे गेले तर त्याबद्दलही वेगवेगळे दावे केले जातात. काहीजण हा धर्म सुमारे 12 हजार वर्षे जुना असल्याचे सांगतात, तर इतर काही मान्यतेनुसार हा 90 हजार वर्षे जुना असल्याचेही सांगितले जाते.
हिंदू शब्दाचा पहिला वापर
तुर्क आणि इराणी भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातून प्रवेश केला. सिंधू हे संस्कृत नाव आहे. त्यांच्या भाषेत 'स' हा शब्द नसल्यामुळे त्यांना सिंधूचा उच्चार करता येत नसल्याने ते सिंधू या शब्दाला हिंदू म्हणू लागले. अशा प्रकारे सिंधूचे नाव हिंदू झाले. इथे राहणाऱ्या लोकांना ते हिंदू म्हणू लागले आणि त्यामुळे हिंदूंच्या देशाला हिंदुस्थान हे नाव पडले.
सनातनचा खरा अर्थ?
सनातन धर्म हा त्या काळापासूनचा आहे, जेव्हा कोणताही संघटित धर्म अस्तित्वात नव्हता आणि इतर कोणतीही जीवनपद्धती नसल्याने त्याला नावाची गरज नव्हती. यानंतर हळूहळू संघटित धर्म निर्माण झाले. सत्यालाच सनातन असे नाव दिले गेले. सनातन हा शब्द सत् आणि तत् मिळून बनलेला आहे. सनातन म्हणजे ज्याची सुरुवात आणि अंत नाही. सनातन धर्म मानणाऱ्यांनाच हिंदू म्हणतात.