८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:54 IST2024-11-25T13:54:02+5:302024-11-25T13:54:24+5:30
Sambhal Violence:

८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरी पोलिसांनी ७ एफआयआर नोंदवल्या आहेत. त्यात एकूण ८०० समाजकंटकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दंगेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात आहेत. त्याशिवाय ड्रोन फुटेजच्या माध्यमातून समाजकंटकांचे फोटो घेतले जात आहेत. सध्या संभलमध्ये कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. तसेच येथील इंटरनेटसेवा मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्याशिवाय तणाव टाळण्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संभलचे एसपी के.के. बिश्नोई यांनी सांगितले की, जामा मशिदीबाहेर झालेल्या हिंसाचारामध्ये १५ पोलीस कर्मचारी आणि ४ अधिकारी जखमी झाले होते. दगडफेकीमधून वाचण्याच्या प्रयत्नात एसडीएमच्या पायाला दुखापती झाली. त्यानंतर त्यांनी ८०० दंगेखोरांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याशिवाय एसपींचे पीआरओ आणि सीओ यांच्या पायामध्ये गोळी लागली. या प्रकरणी आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानंतर एसडीएम आणि इतर अधिकाऱ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात आली होती. मशिदीचा सर्व्हे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सद्यस्थितीत संभलमध्ये कलम १६३ लागू आहे. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे. काही ठिकाणी दुकानंही उघडली आहेत. मात्र आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट बंद ठेवण्याची विनंती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना केली आहे.
तत्पूर्वी पोलिसांनी समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क आणि स्थानिक आमदाराचे पुत्र सोहेल इक्बाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी नियोजनबद्धरीत्या हिंसाचार भडकवल्याचा आणि जमाव गोळा करून त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. जियाउर्रहमान बर्क यांनी मशिदीतील सर्व्हेबाबत केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे जमाव संतप्त झाली आणि हिंसाचारास सुरुवात झाली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.