धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:54 IST2025-08-20T18:53:59+5:302025-08-20T18:54:45+5:30
या घटनेची सध्या पंचक्रोशित चर्चा होत आहे.

धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
पाण्यात राहून मगरीशी वैर नाही करायचे, असे म्हटले जाते. मगरीच्या जबड्यात आलेली शिकार ती कधीही सोडत नाही. मात्र, उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील दोन महिलांनी असाधारण धाडस दाखवले आहे. दोघांनीही वेगवेगळ्या घटनांमध्ये मगरींशी लढून आपल्या मुलाला आणि पतीला वाचवले. एका घटनेत आईने तिच्या ५ वर्षांच्या मुलाला वाचवले, तर दुसऱ्या पत्नीने महिलेने आपल्या पतीला मगरीच्या जबड्यातून वाचवले. त्यांच्या धाडसाची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे.
मुलासाठी मगरीशी भिडली...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रविवारी खैरीघाटच्या धाकिया गावात घडली. घाघरा नदीजवळून जाणाऱ्या पाच वर्षांच्या वीरुला एका मगरीने खेचत पाण्यात नेले. मुलाचा आवाज ऐकून त्याची आईने जीवाची पर्वा न करता मगरीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. मगरीला तोपर्यंत मारत राहिली, जोपर्यंत मगर मुलाला सोडत नाही. अखेर या लढाईत आईचा विजय झाला. या घटनेत मुलाला दुखापत झाली, परंतु त्याचा जीव वाचला, हे महत्वाचे आहे.
पत्नीने साडी फेकून पतीचा जीव वाचवला
दुसरी घटना मोतीपूरच्या माधवपूर गावात घडली. सैफू त्याची पत्नी सुरजनासोबत रामतालिया कालवा ओलांडत असताना एका मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा पाय पकडला. सैफू ओरडला तेव्हा सुरजना हिने तिची साडी पाण्यात फेकली आणि पतीला पाण्याबाहेर ओढले. यादरम्यान गावकऱ्यांनी काठ्याने मगरीवर हल्ला केला आणि पळवून लावले.
पुरामुळे रहिवासी भागात मगरींची हालचाल वाढली
वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे नद्या आणि कालव्यांची पाण्याची पातळी वाढली आहे, ज्यामुळे मगरी रहिवासी भागात येत आहेत. या मगरींना पकडण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना नद्या आणि कालव्यांच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे.