साहित्य अकादमीची ‘दलित चेतना’ आता देशभर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:44 PM2019-10-18T15:44:37+5:302019-10-18T15:50:08+5:30

साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे.

sahitya akademi dalit chetana is now all over the country | साहित्य अकादमीची ‘दलित चेतना’ आता देशभर 

साहित्य अकादमीची ‘दलित चेतना’ आता देशभर 

googlenewsNext

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली - साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे. अकादमीच्या मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांना अलीकडेच पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. 

साहित्य अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात साहित्यातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न होतोय. दलित साहित्यदेखील यातून सुटलेले नाही. अकादमीने खास या समाजातील लेखकांसाठी संमेलनेही आयोजित केली. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिलेले आहे. परंतु, तरीही दलित समाजातील लेखक वर्गाला पूर्णपणे सामावून घेण्यात अकादमीला यश आलेले नाही. त्यामुळे खास दलित लेखकांसाठी ‘दलित चेतना’ या उपक्रमाची सुरुवात अकादमीने दोन महिन्यांपूर्वी केली. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये याअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन होत असते. या मालिकेतील दोन कार्यक्रम झाले आहेत. यात विविध राज्यांच्या दलित लेखकांना आमंत्रित करण्यात आले. कथावाचन, कविता, पुस्तकांवरील चर्चा, सामाजिक विषयांवरील चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. तिसरा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत होईल. पण, हा उपक्रम दिल्लीतपुरता मर्यादित ठेवला तर उद्देश साध्य होणार नाही, याचा विचार करून साहित्य अकादमीने तिन्ही प्रादेशिक कार्यालयांना याअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील सर्व २४ भाषांमधील दलित लेखक यात सहभागी करून घेण्यासाठी ‘दलित चेतना’ राजधानीतून बाहेर पडणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या समाजातील नवलेखक-कवींचे साहित्य पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबईतील प्रादेशिक कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ही तीन राज्ये येतात. त्यामुळे मुंबईतच कार्यक्रम होईल असे नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, शहरात ‘दलित चेतना’चे आयोजन होऊ शकेल, असेही डॉ. राव म्हणाले. 

खास दलित लेखकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, अशी ‘दलित चेतना’ या उपक्रमामागची कल्पना होती. देशभरात त्याचा विस्तार व्हावा, या उद्देशाने प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे.

- डॉ. के. श्रीनिवास राव, सचिव, साहित्य अकादमी

Web Title: sahitya akademi dalit chetana is now all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.