'एनटीए' डीजींची हकालपट्टी; 'नीट'ची सीबीआय चौकशी, लातूरमधून दोघे संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 05:20 AM2024-06-23T05:20:46+5:302024-06-23T05:24:10+5:30

आजची 'नीट-पीजी' लांबणीवर : लातूरमधून दोघे संशयित ताब्यात

Sacked of NTA DG subodh kumar singh, read here details | 'एनटीए' डीजींची हकालपट्टी; 'नीट'ची सीबीआय चौकशी, लातूरमधून दोघे संशयित ताब्यात

'एनटीए' डीजींची हकालपट्टी; 'नीट'ची सीबीआय चौकशी, लातूरमधून दोघे संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या वतीने घेण्यात आलेल्या नीटच्या निकालानंतर झालेल्या गोंधळात पहिली विकेट पडली आहे. केंद्र सरकारने शनिवारी रात्री एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची हंगामी नियुक्ती केली आहे, तर नीटमधील कथित अनियमिततेची चौकशी सीबीआयकडे सोपविली जाईल, असे शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी रात्री सांगितले.

या प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरून एटीएसने शनिवारी लातूर येथून दोघांना ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. गुजरात, पंजाब, हरयाणा, झारखंड व बिहार या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही 'एटीएस'ने तपास सुरू केला आहे.

२३ जून रोजी होणारी नीट-पीजी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. काही स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. 

'स्वच्छते'साठी सात सदस्यीय समिती

नीट आणि यूजीसी नेट या स्पर्धा परीक्षांचा वाद सुरु असतानाच केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारणांसाठी इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या सात सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सादर करणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी काय करता येईल, याबाबत ही समिती शिफारशी करेल. परीक्षा प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारणे, सर्व संभाव्य गैरप्रकारांना आळा घालणे, एनटीएमध्ये सुधारणा करणे हे यामागचे उद्देश आहेत. एकूणच प्रक्रिया सुधारण्यासाठी अनेक पायऱ्यांपैकी ही पहिली पायरी आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

समितीमध्ये कोण
या समितीमध्ये इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे अध्यक्ष असतील, याशिवाय दिल्लीतील एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे कुलगुरू बी.जे. राव, आयआयटी मद्रासमधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील प्रोफेसर के. राममूर्ती, पीपल स्ट्राँगचे सहसंस्थापक आणि कर्मयोगी भारत बोर्ड सदस्य पंकज बन्सल, आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी विभागाचे डीन आदित्य मित्तल आणि शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जैस्वाल यांचा यात समावेश आहे.

सूत्रधाराला अटक 

  • नीट पेपर लीक प्रकरणी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सने ग्रेटर नोएडातील नीमका गावातील
  • रवी अत्री याला अटक केली आहे. २००७ मध्ये अत्रीच्या कुटुंबाने रवी यास वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटा येथे पाठवले होते. त्याने २०१२ मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली आणि पीजीआय रोहतकमध्ये प्रवेश घेतला. परंतु चौथ्या वर्षी तो परीक्षेला बसला नाही.
  • अधिकाऱ्यांनी सांगितले की या काळात तो परीक्षा माफियांच्या संपर्कात आला होता. तसेच तो इतर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेलाही बसला होता. फुटलेले पेपर विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.

झारखंडमधून सहा जण ताब्यात
बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित झुनू सिंग याच्या घरी राहत होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये परमजीत सिंग उर्फ बिट्टू, चिंटू उर्फ बलदेव कुमार, काजू उर्फ प्रशांत कुमार, अजित कुमार, राजीव कुमार उर्फ कारू, पंकू कुमार यांचा समावेश असून ते बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या सर्वांची नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sacked of NTA DG subodh kumar singh, read here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.