नोकरीवरुन काढल्यानं एचआर हेडवर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:58 IST2018-06-07T19:58:40+5:302018-06-07T19:58:40+5:30

ऑफिसला जाताना एचआरवर जीवघेणा हल्ला

sacked employee fires at hr head in gurugram | नोकरीवरुन काढल्यानं एचआर हेडवर झाडली गोळी

नोकरीवरुन काढल्यानं एचआर हेडवर झाडली गोळी

गुरुग्राम : नोकरीवर काढल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीनं कंपनीच्या ह्युमन रिसोर्स हेडवर गोळी झाडली आहे. गुरुग्राममध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विनेश शर्मा असं पीडित एचआर हेडचं नाव आहे. शर्मा त्यांच्या कारनं आयएमटी मानेसरस्थित कार्यालयात जात असताना हा प्रकार घडला. शर्मा हे मित्सुबिशी कंपनीचे कर्मचारी आहेत. 

दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून विनेश शर्मा यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याची माहिती गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र कुमार यांनी दिली. 'विनेश यांनी कार रोखली नाही. त्यांनी उलट कारचा वेग वाढवला. तेव्हा दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळी झाडली,' असं कुमार यांनी सांगितलं. विनेश यांना दोन गोळ्या लागल्या असून हल्लेखोराचा शोध सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचं नाव जोगिंदर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जोगिंदर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. 

जोगिंदरनं विनेश यांच्यावर गोळी झाडल्यानंतर काही पादचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. विनेश यांच्यावर रॉकलँड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नोकरीतील बेजबाबदारपणामुळे विनेश यांनी जोगिंदर यांची हकालपट्टी केल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर जोगिंदरनं विनेश यांना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. 
 

Web Title: sacked employee fires at hr head in gurugram

टॅग्स :Crimeगुन्हा