मुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत सचिन पायलट यांचा गौप्यस्फोट; २०१९ ला नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 20:06 IST2022-03-23T20:05:57+5:302022-03-23T20:06:33+5:30
विशेष म्हणजे वैभव गहलोतनं २०१९ ची लोकसभा निवडणूक जोधपूरहून लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत सचिन पायलट यांचा गौप्यस्फोट; २०१९ ला नेमकं काय घडलं?
राजस्थानात काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. याठिकाणी सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत(Ashok Gehlot) हे दोन्ही गट सक्रीय झालेत. त्यात आता सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वैभव गहलोतला तिकीट देण्यासाठी पक्षाचे नेतृत्व तयार नव्हते. मी वैभवची बाजू मांडली म्हणून त्याला तिकीट मिळाले असं पायलट यांनी सांगितले.
सचिन पायलट(Sachin Piolet) म्हणाले की, वैभवला तिकीट देण्यासाठी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोललो होतो. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघंही वैभवला तिकीट देण्यास इच्छुक नव्हते. तेव्हा वैभवनं महासचिव म्हणून काम केले आहे. त्याला तिकीट द्यायला हवे असं मी दिल्लीत सांगितले होते. परंतु सोनिया गांधी आणि राहुल गांधी तिकीट देण्यासाठी तयार नव्हते. वैभव गहलोतनं याआधीही तिकीट मागितली होती मात्र पक्षाने संधी दिली नव्हती असं त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वैभव गहलोतनं २०१९ ची लोकसभा निवडणूक जोधपूरहून लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वैभवच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलटला घ्यावी लागेल असं विधान केले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास पायलट यांनी नकार दिला होता. जून २०१९ मध्ये अशोक गहलोत एका मुलाखतीत म्हटले होते की, जोधपूर मतदारसंघात वैभवचा पराभव झाला त्याची जबाबदारी सचिन पायलटनं घ्यायला हवी.
वैभव गहलोत यांना भाजपाच्या गजेंद्र सिंह शेखावत यांनी २.७ लाख मतांनी हरवलं होते. वैभव मोठ्या फरकाने विजयी होईल असं पायलट म्हणाले होते. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसेत काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसचा प्रचारही जोरात झाला. तरीही वैभव गहलोतला हार पत्करावी लागली. त्यामुळे किमान या जागेच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलटनं घ्यायला हवी. जोधपूर जागेवर पूर्ण आढावा घेतला पाहिजे अखेर त्याठिकाणी काँग्रेसला विजय का मिळाला नाही? असंही मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले होते.