एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:58 IST2026-01-09T13:58:17+5:302026-01-09T13:58:41+5:30
S Jaishankar 670 km road trip America : अमेरिकेतील शटडाऊनमुळे विमान सेवा बंद असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ६७० किमीचा प्रवास कारने केला.

एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
न्यूयॉर्क: अमेरिका फर्स्ट, अमेरिका बलाढ्यची टीमकी वाजवणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेवर जगभरातून नाचक्कीची वेळ आणलेली आहे. अमेरिका खंडाच्या एकेक देशावर दादागिरी करत विस्तारवादाची स्वार्थी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून युक्रेन, चीन, अफगाणिस्तान सारख्या देशांतून खनिजांसाठी स्वार्थ साधणाऱ्या ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टेरिफ लावून ब्लॅकमेलिंग सुरु केले आहे. अशातच सप्टेंबरमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर रस्त्याने शेकडो किमीचा प्रवास करण्याची वेळ अमेरिकेने आणली होती. हे आता बाहेर आले आहे.
सप्टेंबर २०२५ मधील त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान घडलेला एक प्रसंग आता समोर आला आहे. अमेरिकेतील 'सरकारी शटडाऊन'मुळे विमान सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे जयशंकर यांना तब्बल ६७० किलोमीटरचा (४१६ मैल) प्रवास रस्ते मार्गाने पूर्ण करावा लागला होता.
सप्टेंबर महिन्यात जेव्हा एस. जयशंकर अधिकृत दौऱ्यावर होते, तेव्हा अमेरिकेत अचानक सरकारी कामकाज ठप्प झाले होते. यामुळे व्यावसायिक उड्डाणे रद्द झाली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशी होणारी महत्त्वाची भेट चुकवता येणार नव्हती. अशा परिस्थितीत अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने त्यांना रस्ते मार्गाने न्यूयॉर्कला नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा अहवाल नुकताच अमेरिकन डिप्लोमॅटिक सिक्युरिटी सर्व्हिसने सार्वजनिक केला आहे.
कडाक्याची थंडी...
७ तासांचा प्रवास आणि गोठवणारी थंडी कॅनडा सीमेजवळील लेविस्टन-क्वीनस्टन पुलापासून हा प्रवास सुरू झाला. कडाक्याची थंडी आणि दुर्गम भागातून जाणारा रस्ता असतानाही ७ तासांत जयशंकर यांचा ताफा मॅनहॅटनमध्ये पोहोचला. या प्रवासात २७ सुरक्षा एजंट त्यांच्यासोबत होते. या प्रवासावेळी न्यूयॉर्क शहरात प्रवेश करताना जयशंकर यांच्या ताफ्यासमोर एक अपघात झालेली महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. 'हिट अँड रन'ची केस होती. परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल असतानाही, सुरक्षा पथकाने ताफा थांबवला. एका एजंटने त्या महिलेला प्राथमिक मदत दिली, तर इतरांनी ट्रॅफिक नियंत्रित केले जेणेकरून रुग्णवाहिका तातडीने पोहोचू शकेल.