दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 20:33 IST2025-07-13T20:33:23+5:302025-07-13T20:33:43+5:30
Karnataka Crime News: कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणी असलेल्या एका गुहेमध्ये एक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता या महिलेच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड
कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणी असलेल्या एका गुहेमध्ये एक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता या महिलेच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलिसांचं गस्तीपथक या भागात आलं असताना गुहेच्या प्रवेशद्वारावर काही कपडे दिसून आले होते. त्यामुळे या गुहेत कुणीतरी वास्तव्यास असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर या गुहेतून एक परदेशी मुलगी पळत बाहेर जाताना दिसली. त्यानंतर सदर महिला आणि तिच्या मुलींना ताब्यात घेण्यात आले.
नीना कुटिना आणि प्रेमा आणि एमा या तिच्या मुली दुर्गम भागात असलेल्या या गुहेमध्ये अगदी आरामात राहताना दिसून आल्या होत्या. दरम्यान, या भागात विषारी साप आणि इतर श्वापदांचा वावर असल्याने हा परिसर वास्तव्यास धोकादायक असल्याचे सांगून पोलिसांनी सदर रशियन महिला आणि तिच्या मुलींना तिथून बाहेर पडण्यास तयार केले.
दरम्यान, सदर महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून भारताच वास्तव्य करून होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच मला जंगलात राहून देवाची पूजा आणि ध्यानधारणा करायची होती. त्यामुळे मी माझ्या मुलींसह गोव्याहून इथे आले आहे, अशी माहिती या महिलेने चौकशीमधून दिली.
ही महिला ज्या गुहेत राहत होती तिथे विठ्ठलाची मूर्ती सापडली आहे. तसेच ही महिला विठ्ठलाची पूजा करत होती. तसेच भगवान श्रीकृष्णाने ध्यानधारणा करण्यासाठी मला इथे पाठवल्याचा दावा या महिलेने केला. दरम्यान, आता या महिलेला एका आश्रमात ठेवण्यात आले आहे. तर तिच्या मुलींना बालगृहात नेण्यात आले आहेत. आता त्यांना परदेशी नागरिकांसांठीच्या बंगळुरूमधील डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच तिथून त्यांना परत रशियाला पाठवण्यात येणार आहे.