आशेचा किरण : इंग्लंड, रशियाने तयार केली कोरोना विरोधातील लस; ...तर लवकरच पोहोचेल सर्वसामान्यांपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 17:36 IST2020-03-28T17:20:15+5:302020-03-28T17:36:40+5:30
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. येथी 18 ते 55 वर्ष वयातील लोकांवर हिचा प्रयोग करायलाही सुरुवात करण्यात आली आहे.

आशेचा किरण : इंग्लंड, रशियाने तयार केली कोरोना विरोधातील लस; ...तर लवकरच पोहोचेल सर्वसामान्यांपर्यंत
नवी दिल्ली - कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे. जगातील अनेक देशांत कोरोना विरोधातील औषध अथवा लस तयार करण्यासाठी यूद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यातच आता एक दिलासादाक बातमी समोर आली आहे. इंग्लंड आणि रशियाने कोरोना विरोधातील लस तयार केली आहे. सर्वात चांगली गोष्ट ही, की या दोन्ही देशांनी तयार केलेल्या लसीचे परिणाम अत्यंत आशादायक आहेत.
वैद्यकीय प्रयोग सुरू -
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. येथी 18 ते 55 वर्ष वयातील लोकांवर हिचा प्रयोग करायलाही सुरुवात करण्यात आली आहे. या अनुशंगाने आता इंग्लंडच्या औषध प्राधिकरणाने ChAdOx nCoV-19 नावाचे औषध तयार करायला मंजुरीही दिली आहे.
याच प्रकारे रशियातील शास्त्रज्ञांनीही कोरोना विरोधातील लस तयार केली आहे. येथील व्हेक्टर स्टेट व्हायरॉलॉजी अँड बायोटेक सेंटरने ही लस तयार केली आहे. जनावरांवर हीचे प्रयोग केले जात आहेत. ही लसही लवकरच बाजारात येण्याची आशा आहे.
केव्हापर्यंत पोहोचले सामान्य नागरिकांपर्यंत -
ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रमुख जोनाथन क्विक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लसीला सरकारची मंजुरी मिळाल्यानंरही तिचे रिअॅक्शन्स लक्षात घ्यावे लागतात. जगातील अनेक देशांत, अशा प्रकारची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ती सुरक्षिततेच्या कसोटींवर सिद्ध झाल्यानंतरच लोकांपर्यंत पोहोचू शकेल. याचबरोबर हिची किंमतही तेवढीच महत्वाची असेल. ती फार महाग असल्यास सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अवघड होईल.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास 6,00,000 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती आहे. यामुळे भारतात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.