“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:38 IST2026-01-11T16:37:48+5:302026-01-11T16:38:30+5:30
RSS Chief Mohan Bhagwat News: ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, असुरी शक्तींचे तुकडे झाले. आपल्याला जागे होण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
RSS Chief Mohan Bhagwat News: पुढील २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरू बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल. भारताची ही सध्याची गरज आहे की, भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि सगळे भेद, मतभेद विसरले पाहिजे. हिंदू समाजाचा, राजांचा पराभव तेव्हाच झाला आहे जेव्हा समाज विभागला गेला किंवा त्यात फूट पडली. हिंदू म्हणून एक व्हा, कुठलाही भेदभाव बाळगू नको. तुम्हाला मैत्री करायची आहे, हे लक्षात ठेवा, आपल्याच माणसांना वैरी समजू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
वृंदावनमध्ये सनातन संस्कृती महोत्सव कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपल्या देशातील संतांची शिकवण आठवा. सगळ्यांनीच आपल्याला भेदाभेद दूर ठेवण्याचा संदेश दिला आहे. सगळ्या हिंदूंनी जातीभेद, मतभेद विसरून एक झाले पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा भेदाभेद नको. हिंदू समाजातले अंतर्गत वाद हेच आपल्या समुदायाचं नुकसान करत आले आहेत, पराभूत करत आले आहेत. आपण जितके फिरू, समाजात वावरू तेवढे आपल्याला समाजाबाबत समजेल, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
हिंदू समजाने एकत्र आले पाहिजे ही गरज आहे
हिंदू समाज हा एक आहे. पण जग आपल्याला जाती, भाषा, धर्म, पंथ, संप्रदाय म्हणून पाहते. जगाचा हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जगात जेवढे हिंदू आहेत, त्यांनी हिंदू समाजातील व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे. सौहार्द बाळगला पाहिजे. एकमेकांच्या घरी जाणे, जेवण करणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे या गोष्टी हिंदू समाजातील सगळ्या व्यक्तींनी केल्या पाहिजे. हिंदू समजाने एकत्र आले पाहिजे ही गरज आहे. एखादी परिस्थिती तोपर्यंतच असते, जेव्हा आपण तिला घाबरतो किंवा त्यापासून मागे हटतो. आपण ठामपणे एकत्र उभे राहिलो, तर जगात अशी कोणतीही शक्ती नाही, जी आपल्यासमोर उभी राहू शकेल. अशी कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती नाही जी आपण जिंकू शकत नाही. आपल्याला फक्त जागे होण्याची आणि दोन पावले पुढे जाण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
दरम्यान, हिंदू समाज आणि सनातन समाज एकत्र येतील, तसे आसुरी शक्ती नुकसान करू शकणार नाहीत. पराभव हा विभाजनामुळे झाला. आपण हे आधी पाहिले आहे की, ते आपले काहीच बिघडवू शकत नाहीत. आपण तयारीत नव्हतो म्हणून ते डोक्यावर नाचत होते. त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ते पोखरले गेले आहेत. त्यांना जगभरातून पराभूत व्हावे लागत आहे. भविष्यात ते स्वतःहून कोसळतील. आपण एकत्र येताच ते विखुरले जातील. गेल्या ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, त्यांचे तुकडे झाले, असेही त्यांनी सांगितले.