₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:36 IST2024-09-27T17:34:19+5:302024-09-27T17:36:00+5:30
नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे, खरहाल व्हॅलीमध्ये बिजली महादेव रोपवेची घोषणा केली होती...

₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत आता केंद्र सरकारच्याच एका प्रोजेक्ट विरोधात मैदानात उतरल्या आहेत. नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे, खरहाल व्हॅलीमध्ये बिजली महादेव रोपवेची घोषणा केली होती. मात्र आता कंगना राणौत यांनी 272 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक लोकांकडून प्रोजेक्टला विरोध -
बिजली महादेव मंदिराच्या रोपवेसंदर्भात खराहल आणि कशावरी खोऱ्यातील लोक अनेक दिवसांपासून विरोध करत आहेत. बिजली महादेव रोपवेच्या विरोधात ग्रामस्थांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. रोपवेमुळे देवता खूश नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, रोपवे बांधल्यामुळे आपल्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय, रोप वेसाठी अनेक झाडे कापली जाणार असल्याने पर्यावरणाचीही हानी होणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
काय म्हणाल्या कंगना रणौत -
या प्रकल्पासंदर्बात आपण नितीन गडकरी यांची भेट घेतली असून त्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आमच्या देवाची इच्छा नसेल तर येथे हा प्रोजेक्ट बंद व्हायला हवा. मी पुन्हा नितीन गडकरी यांची भेट घेईल. आपल्यासाटी आपल्या देवतेचा आदेश आधुनिकीकरणाहूनही अधिक महत्वाचा आहे, असे कंगना राणौत यांनी म्हटले आहे.
नितिन गडकरी यांनी केले होते भूमिपूजन-
हिमाचलमधील कुल्लू येथील मोहल नॅचर पार्कमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते बिजली महादेव रोपवेचे व्हर्च्युअली भूमिपूजन करण्यात आले होते. या रोप वेचे काम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा रोप वे तयार झाल्यानंतर 36000 पर्यटक एका दिवसात बिजली महादेवला पोहोचतील आणि यथील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.