नवी दिल्ली - दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून राऊज एवेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या घोटाळ्याच्या आरोपात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, विजय नायर यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप झाले होते. मात्र या सर्व आरोपातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले. मोदी-शाह यांनी षडयंत्र रचले आणि आम्हाला भ्रष्टाचारी ठरवले होते असा आरोप केजरीवाल यांनी केला.
कोर्टाने आरोपातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, सत्येचा विजय होतो हे आम्ही कायम म्हणत होतो. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायाधीशांनी आम्हाला न्याय दिला. सत्याचा विजय झाला आहे. आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी मिळून सर्वात मोठे षडयंत्र रचले. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले गेले. विद्यमान मुख्यमंत्र्यांना घरातून बाहेर काढत ६ महिने जेलमध्ये ठेवले. उपमुख्यमंत्र्यांना २ वर्ष जेलमध्ये ठेवले. हे सगळे खोटे गुन्हे होते. आम्हाला भ्रष्टाचारी ठरवण्यात येत होते असं सांगताना अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले.
तर मी भ्रष्ट नाही. मी माझ्या प्रामाणिकपणाने जीवन जगतोय. आमच्यावर खोटे आरोप लावले परंतु आज कोर्टात सिद्ध झाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया असो आम आदमी पक्ष हा प्रामाणिक आहे. सत्तेसाठी पंतप्रधानांनी देशाशी खेळू नये. संविधानाशी खेळू नका. तुम्हाला सत्ता हवी तर चांगली कामे करा. आज देशासमोर कित्येक प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी त्याशिवाय देशात रस्त्यांची दुरावस्था आहे. सगळीकडे प्रदुषण आहे. चहुबाजूने देशात वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करून सत्ता मिळवा. केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खोटे आरोप का करता असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.
दरम्यान, २४ तास राजकारण करणे, खोटे आरोप करून विरोधकांना अडकवणे, त्यांना जेलमध्ये टाकणे हे पंतप्रधानांना शोभत नाही. त्यातून देश पुढे जाणार नाही. देशातील जनतेचे प्रश्न सुटले तर देश पुढे जाईल असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
कोर्टाने काय म्हटलं?
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोप सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली. या प्रकरणात कुठलेही गुन्हेगारी षडयंत्र दिसत नाही. त्याशिवाय काही ठोस पुरावेही नाहीत. संपूर्ण खटला पाहिला तर त्यात गुन्हेगारी कृत्य झाल्याचे सिद्ध होत नाही. कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय एखाद्याला अडकवणे यावरून न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सीबीआयला फटकारले. आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत ज्यात पुरावे, साक्षी अपुऱ्या आहेत असंही कोर्टाने म्हटलं.
Web Summary : Arvind Kejriwal acquitted in liquor scam, court cites lack of evidence. He accuses Modi-Shah of conspiracy, claiming false charges. Kejriwal emphasizes truth prevails and criticizes using power for political vendettas. CBI was reprimanded for insufficient evidence.
Web Summary : शराब घोटाले में अरविंद केजरीवाल बरी, अदालत ने सबूतों की कमी बताई। उन्होंने मोदी-शाह पर साजिश का आरोप लगाया, झूठे आरोप का दावा किया। केजरीवाल ने सच्चाई की जीत पर जोर दिया और राजनीतिक प्रतिशोध के लिए सत्ता के इस्तेमाल की आलोचना की। सीबीआई को अपर्याप्त सबूतों के लिए फटकार लगाई गई।