The role of Congress in Hindi should also be communicated to fellow parties; BJP trolls Congress | हिंदीबाबत काँग्रेसची भूमिका सहकारी पक्षांनाही सांगावी; भाजपाने केलं काँग्रेसला ट्रोल 

हिंदीबाबत काँग्रेसची भूमिका सहकारी पक्षांनाही सांगावी; भाजपाने केलं काँग्रेसला ट्रोल 

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरुन राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. दक्षिणेतील अनेक नेत्यांनी शहांच्या वक्तव्याचा निषेध केला असून कर्नाटकातील भाजपा नेत्यांनीही कन्नड भाषेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला. कन्नड, उडिया, मराठी, हिंदी, तामिळ, इंग्रजी, गुजराती, बांग्ला, उर्दू, पंजाबी, कोंकणी यासारख्या विविध भाषा असणे हा आपला कमकुवतपणा नाही असं अमित शहांना सांगितले आहे. मात्र यावरुन काँग्रेस आणि भाजपात ट्विटर वॉर सुरु झालं आहे. 

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत हिंदी भाषेवरुन काँग्रेसला टोला लगावला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत हिंदी भाषेबाबत काँग्रेसची भूमिका त्यांच्या सहकारी पक्षांनाही सांगावी असं सांगितले आहे. 
किरण रिजिजू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत पी. चिदंबरम हिंदी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणत आहेत की, मी अपेक्षा करतो, आपली राजभाषा हिंदी पूर्ण देशात विकसित करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे प्रयत्नशील आहोत. हा व्हिडीओ 14 सप्टेंबर 2010 चा आहे. 

अमित शहांच्या वक्तव्यावर बी.एस येदियुरप्पा यांनीही ट्विट करत सांगितले आहे की, देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडझोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले आहे. 

तर दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला करुन अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत कमल हासन म्हणाले, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन दिले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही शाह, सुल्तान  किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत असं त्यांनी सांगितले होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The role of Congress in Hindi should also be communicated to fellow parties; BJP trolls Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.