Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:56 IST2025-11-15T19:53:34+5:302025-11-15T19:56:25+5:30
Rohini Acharya Sanjay Yadav: ज्यांच्यावर निशाणा साधत तेज प्रताप यादव यांनी पक्ष सोडला, त्यांच्यावरच आता लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी गंभीर आरोप केला आहे. रोहिणी आचार्य यांच्या पोस्टमुळे संजय यादव बिहारच्या राजकारणात चर्चेत आले आहेत.

Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
Rohini Acharya Lalu prasad Yadav Family: बिहारमध्ये पक्षातील राजकीय वाद लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे. पक्षातील नेत्याबद्दलची नाराजी स्पष्ट शब्दात मांडत लालू प्रसाद यादव यांच्या कन्या यांनी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केलीच, त्याचबरोबर यादव कुटुंबासोबतचे संबंधही तोडत असल्याचे जाहीर केले. रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये संजय यादव यांच्या नावाचा उल्लेख केला. याच संजय यादवांना जयचंद म्हणत तेज प्रताप यादव यांनी आपली नाराजी व्यक्ती केली होती. त्यांना लालू प्रसाद यादव यांनी वेगळ्या कारणामुळे कुटुंबातून बाहेर काढले होते. पण, आधी तेज प्रताप आणि आता रोहिणी आचार्य यांच्यामुळे यादव कुटुंबात फूट पडली आहे.
वडिलांना स्वतःची किडनी देणार्या रोहिणी आचार्य यांनी एक संतप्त पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी संजय यादव आणि रमीज या दोघांचा नावाचा उल्लेख केला आहे. पण, यात सर्वात जास्त चर्चा संजय यादव यांची होत आहे.
रोहिणी आचार्य यांनी संजय यादवांना ठरवले जबाबदार
'मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे. हे मला संजय यादव आणि रमीज यांनी करायला सांगितलं होतं', असे रोहिणी आचार्य यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर ज्यांच्यामुळे लालूंच्या कुटुंबात फूट पडली संजय यादव कोण अशी चर्चा सुरू झाली.
संजय यादव कोण आहेत?
राष्ट्रीय जनता पक्षातील वादाने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबालाच तडा गेला आहे. यासाठी संजय यादव यांना जबाबदार ठरवले जात आहे. संजय यादव हे मूळचे हरयाणातील महेंद्रगढ येथील आहेत. शालेय शिक्षणापासूनच ते हुशार आहेत. संजय यादव यांनी संगणक शास्त्र विषयात एम.एससी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.
व्यवस्थापन, डेटा विश्लेषण आणि रणनीती आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते एका कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या बोलण्यात हरयाणवी लहेजा आहे. पण, बिहारच्या राजकारणात त्याचा प्रभाव मोठा आहे.
तेजस्वी यादव यांच्यासोबत मैत्री
संजय यादव आणि तेजस्वी यादव यांची जुनी मैत्री आहे. दोघांची भेट दिल्लीत झाली होती. दोघे आधी सोबत क्रिकेट खेळायचे असेही सांगितले जाते. २०१२ मध्ये संजय यादव हे हळूहळू राष्ट्रीय जनता दलामध्ये सक्रिय झाले. कारण त्याच काळात तेजस्वी यांनी त्यांच्याकडून राजकीय सल्ले घेण्यास सुरुवात केली होती.
नोकरी सोडली, तेजस्वी यादवांचे सल्लागार बनले
संजय यादव यांनी नंतर नोकरी सोडली आणि तेजस्वी यादव यांची सोबत पूर्णवेळ काम करण्याची ऑफर स्वीकारली. २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी पक्षासाठी काम सुरू केले. आजघडीला त्यांना तेजस्वी यांचा राईट हॅण्ड म्हटले जाते. राष्ट्रीय जनता दलाने त्यांना २०२४ मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले होते.
खटके उडण्यास सुरूवात झाली
संजय यादव यांच्या तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून पक्षाचे निर्णय घेण्यातील हस्तक्षेप जास्त वाढला. त्यांच्यावर सर्वात आधी तेज प्रताप यादव यांनी नाराज झाले. त्यांनी संजय यादव यांना जयचंद म्हणत टीका करण्यास सुरूवात केली. त्यांच्या पाठोपाठ रोहिणी आचार्य यांनीही नाराजीच्या पोस्ट टाकल्या. आता त्यांनी थेट संजय यादव यांचे नाव घेत राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा करून टाकली.