रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:42 IST2025-07-17T16:40:18+5:302025-07-17T16:42:25+5:30

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढू शकतात.

Robert Vadra questioned by ED for 18 hours; Chargesheet filed, what is the case? Find out | रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

Robert Vadra:काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यासोबतच इतर अनेक लोक आणि कंपन्यांची नावेही त्यात सामील आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा खटला सप्टेंबर २०१८ चा आहे. रॉबर्ट वाड्रा, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ आणि एका प्रॉपर्टी डीलरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये भ्रष्टाचार आणि फसवणूक यासह इतर आरोप लावण्यात आले आहेत.

आरोपपत्रानुसार, वाड्रा यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने २००८ मध्ये ३.५३ एकर जमीन ७.५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. तर प्रकल्प पूर्ण न करताच तीच जमीन ५८ कोटी रुपयांना विकली. आरोपपत्रात वाड्रांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात, एजन्सीने वाड्रा यांची १८ तासांहून अधिक काळ चौकशी केली. यासोबतच हरियाणातील इतर अनेक काँग्रेस नेत्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यांच्या जबाबांचा आरोपपत्रात उल्लेख आहे.

वाड्रा यांच्याविरुद्धचे आरोप
वाड्रा यांच्यावर आरोप आहे की, त्यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ३.५ एकर जमीन ७.५ कोटी रुपयांना खरेदी केली. हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुडा सरकारने रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीला परवाना देऊन या जमिनीतील २.७० एकर जमीन व्यावसायिक वसाहत म्हणून विकसित करण्याची परवानगी दिली. निवासी प्रकल्पाचा परवाना मिळाल्यानंतर जमिनीची किंमत वाढली. नंतर, वाड्रा यांच्याशी संबंधित कंपनीने ही जमीन डीएलएफला ५८ कोटी रुपयांना विकली.

नंतर, हुडा सरकारने निवासी प्रकल्पाचा परवाना डीएलएफला हस्तांतरित केला. या संपूर्ण व्यवहारात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हरियाणा पोलिसांनी या कराराशी संबंधित गुन्हा दाखल केला. नंतर ईडीनेही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

IAS अशोक खेमका यांनी केलेला खुलासा 

आयएएस अशोक खेमका यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित या प्रकरणात अनियमितता उघड केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये ईडीने या प्रकरणात यूएईस्थित व्यापारी सीसी थंपी आणि युके शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारी यांचे नातेवाईक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात वाड्रा आणि त्यांची पत्नी प्रियंका गांधी यांचे नाव आरोपी म्हणून नाही, परंतु त्यांच्या जमीन खरेदी-विक्रीचा तपशील समाविष्ट आहे.

ईडीने म्हटले होते की, वाड्रा यांच्याशी संबंध असलेल्या थंपी यांनी २००५ ते २००८ दरम्यान दिल्ली-एनसीआरस्थित रिअल इस्टेट एजंट एचएल पहवा यांच्यामार्फत हरियाणाच्या फरीदाबादमधील अमीरपूर गावात सुमारे ४८६ एकर जमीन खरेदी केली होती. आरोपपत्रानुसार, रॉबर्ट वड्रा यांनी २००५-२००६ मध्ये एचएल पहवा यांच्याकडून अमीरपूरमध्ये ३३४ कनाल (४०.०८ एकर) जमीन खरेदी केली आणि डिसेंबर २०१० मध्ये तीच जमीन एचएल पहवा यांना विकली. ईडीच्या म्हणण्यानुसार, रॉबर्ट वड्रा यांच्या पत्नी प्रियांका गांधी वड्रा यांनी एप्रिल २००६ मध्ये हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातील अमीरपूर गावात ४० कनाल (०५ एकर) शेती जमीन एचएल पहवा यांच्याकडून खरेदी केली आणि फेब्रुवारी २०१० मध्ये तीच जमीन एचएल पहवा यांनाच विकली.

Web Title: Robert Vadra questioned by ED for 18 hours; Chargesheet filed, what is the case? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.