कृषी कायद्यांच्या विरोधात ‘आरएलपी’ही ‘रालोआ’तून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 00:31 IST2020-12-27T00:30:57+5:302020-12-27T00:31:23+5:30
हनुमान बेनिवाल हे राजस्थानातील नागौर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.

कृषी कायद्यांच्या विरोधात ‘आरएलपी’ही ‘रालोआ’तून बाहेर
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : हनुमान बेनिवाल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीेने तीन कृषी कायद्यांच्या विरोधात भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा शनिवारी केली.
हनुमान बेनिवाल हे राजस्थानातील नागौर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. रालोआ सोडणारा हा पाचवा पक्ष ठरला आहे. या आधी शिवसेना आणि इतर दोन प्रादेशिक पक्षांनी रालोआला याआधीच सोडचिठ्ठी दिली आहे. पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) गेल्याच महिन्यात रालोआतून बाहेर पडला आहे. आता रालोआमध्ये १९ पक्ष असून त्यात भाजपा हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. १६ डिसेंबर रोजी लोकसभेत एनडीएचे ३३४ खासदार होते.
बेनिवाल यांच्या सोडचिठ्ठीनंतर ३३३ खासदार उरतील. कृषी कायद्याच्या मुद्यावर अकाली दल अलीकडेच मोदी सरकारमधून बाहेर पडला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने रालोआतून बाहेर पडून २०२१ च्या प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसशी आघाडी केली आहे. बेनिवाल यांच्या बाहेर पडण्यानंतरही भाजपा नेते अविचलित आहेत. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे. तथापि, कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, असे भाजपाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.