बिहारमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पाटणा येथे मंगळवारी संध्याकाळी आरजेडी नेते आणि प्रॉपर्टी डिलर रायकुमार राय उर्फ आला राय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना चित्रगुप्तनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार राजकुमार राज आपल्या कारने घराजवळ पोहोचले होते. त्याचवेळी तिथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळी लागल्यानंतर राय हे जीव वाचवण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये घुसले. मात्र हल्लेखोरांनी त्या हॉटेलमध्ये घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. यातील एक गोळी हॉटेलमधील फ्रिजलाही लागली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राजकुमार राय यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोरांनी राय यांच्यावर ८ ते १० गोळ्या झाडल्याचा आरोपा राज यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
माझा भाऊ राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. जर या प्रकरणातील आरोपींना पकडले गेले नाही, तर मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केलं जाईळ, असा इशारा राजकुमार राय यांची बहीण शिला देवी हिने दिला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपींची नावं त्यांनी जाहीर केलेली नाहीत.