रिक्षा चालकाची मुलगी झाली लेफ्टनंट; वडिलांना आनंदाश्रू, गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:57 IST2025-01-28T18:57:02+5:302025-01-28T18:57:35+5:30
जियाचे वडील मोहनलाल हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी आपल्या मुलीला आनंदाने मिठी मारली. मुलीचं घवघवीत यश पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

फोटो - आजतक
हरियाणातील रेवाडी येथे राहणाऱ्या एका मुलीने कमाल केली आहे. आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने ती एनडीए क्वालिफाय झाली आणि लेफ्टनंट बनून आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं आहे. जियाचे वडील मोहनलाल हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी आपल्या मुलीला आनंदाने मिठी मारली. मुलीचं घवघवीत यश पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जिया ही सुलखा गावची रहिवासी आहे.
जिया म्हणाली की, बारावीत असताना तिने एनडीएमध्ये सामील होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. चार-पाच महिन्यांचं कोचिंग आणि कठोर परिश्रमानंतर, तिने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर एसएसबी परीक्षा उत्तीर्ण होऊन हे स्थान मिळवलं. जिया म्हणाली की, हे केवळ कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि वडिलांच्या कठोर परिश्रमामुळे शक्य झालं आहे.
जियाची बहीण पारुलने दिलेल्या माहितीनुसार, जिया रात्रंदिवस अभ्यास करायची आणि तिचं यश संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी आहे. पारुलचं स्वप्न आहे की, तिने कठोर परिश्रम करून चार्टर्ड अकाउंटंट बनून तिच्या कुटुंबाचं नाव मोठं करावं.
जियाचे आजोबा आणि गावाचे माजी सरपंच होशियार सिंह यांनी सांगितलं की, जियाने गुरुग्राममध्ये एका सरकारी शाळेत शिक्षण घेतलं आणि सहा महिने कोचिंग घेतल. मुलींना मुलांप्रमाणेच समान संधी दिल्या पाहिजेत जेणेकरून त्या देखील त्यांच्या कुटुंबाचं, गावाचं आणि देशाचं नाव मोठं करू शकतील. गावकऱ्यांनी जियाचं मोठ्या आनंदात गावात स्वागत केलं आहे.