१४ मे रोजी बैठक : थकीत कर्जाबाबत चर्चा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १४ मे रोजी अर्थमंत्री पी. चिदंबरम सरकारी बँकांच्या कामगिरीबाबत आढावा घेणार आहेत. या बँकांच्या प्रमुखांसमवेत चिदंबरम यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी बँकिंग क्षेत्रातील समस्यांबाबत अर्थमंत्री चर्चा करणार आहेत. कर्जवसुली, कर्जवितरणात झालेली वाढ, प्राधान्य क्षेत्रासाठी झालेले कर्जवितरण इत्यादी बाबींचा यात समावेश आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. नियमितपणे घेतल्या जाणार्या आढाव्याबरोबरच भांडवलवृद्धीचा मुद्दाही यावेळी चर्चेत असेल, असे अर्थ मंत्रालयातील अधिकार्याने सांगितले.सरकारला वाढत्या थकीत कर्जाबाबत चिंता आहे. त्यामुळे या विषयाबाबत बँकांनी कडक भूमिका घेऊन थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत यावेळी सांगितले जाईल, अशी शक्यता आहे.ुकृषी, गृह, शिक्षण; तसेच छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी दिलेल्या कर्जांबाबतही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.२0१३-१४ या आर्थिक वर्षातील वित्तीय समायोजनाचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार असल्याचे या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)