"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 22:06 IST2025-12-14T22:05:32+5:302025-12-14T22:06:30+5:30
"गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा न मिळाल्याने आता 'एसआयआर'च्या (SIR) नावाखाली दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहे."

"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या रामलीला मैदानावर झालेल्या ‘वोट चोर, गद्दी छोड’ (व्होट चोर, खुर्ची सोड) रॅलीदरम्यान भाजपवर गंभीर आरोप केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा न मिळाल्याने आता 'एसआयआर'च्या (SIR) नावाखाली दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
रेड्डी म्हणाले, "त्यांना (भाजपला) ४०० जागा मिळाल्या नाहीत, म्हणून ते 'एसआयआर'च्या (SIR) नावाखाली दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांची मते संपवण्यामागे लागले आहेत. ही मतचोरीची समस्या केवळ काँग्रेसची नाही, तर संपूर्ण देशाची आहे." तसेच, "कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या या लढाईत खांद्याला खांदा लावून उभे राहावे, अन्यथा हे लोक गरीबांचे हक्क हिरावून घेतील. आपल्याला राहुल गांधींचा सिपाही बनून मोदींविरुद्ध लढायचे आहे," असे आवाहनही त्यांनी केले.
काय म्हणाले राहुल गांधी? -
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी, भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. "चोरी करणे हे भाजपच्या डीएनएमध्ये आहे," असे सांगत काँग्रेस पक्ष सत्याच्या बाजूने उभा राहून 'आरएसएसच्या सरकारला' देशाबाहेर करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर, पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास संपला आहे, कारण त्यांना त्यांची मतचोरी पकडली गेल्याची जाणीव झाली आहे, असा दावाही राहुल गांधींनी यांनी यावेळी केला.
सत्याच्या बाजूने उभे राहून आम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह आणि RSS ची सत्ता उलथवून टाकू -
राहुल गांधी पुढे म्हणाले, हा देश सत्याचा आहे. देशातील जनतेला सत्य समजते आणि त्यासाठी लढते. पण संघासाठी सत्य नव्हे, सत्ता महत्त्वाची आहे. तरीही मी खात्रीने सांगतो की, सत्याच्या बाजूने उभे राहून आम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह आणि RSS ची सत्ता उलथवून टाकू. गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत ते म्हणाले, सभागृहात माझ्या प्रश्नांवर अमित शाह यांचे हात थरथरत होते. सत्तेत असतानाच ते धाडसी असतात; सत्ता गेली की त्यांची धाडसही संपेल.