आझादांची माघार; भाजपला फटका, आरोग्याचे दिले कारण; पक्षाच्या चार उमेदवारांनीही दिला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:37 IST2024-09-02T14:37:33+5:302024-09-02T14:37:49+5:30
Jammu & Kashmir Assembly Election 2024: गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे.

आझादांची माघार; भाजपला फटका, आरोग्याचे दिले कारण; पक्षाच्या चार उमेदवारांनीही दिला धक्का
जम्मू - जम्मू- काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चिनाब खोऱ्यातील ८ मतदारसंघांत होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे.
डीपीएपीतील या घडामोडींमुळे नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस आघाडीला या चार मतदारसंघांत फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. भाजप, पीडीपी आघाडीला पराभूत करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे.
लढत कुणामध्ये?
-नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने बनिहाल, भादेरवाह, डोडा येथे मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवार उभे केले आहेत, तर नॅशनल कॉन्फरन्सचा बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून इंद्रेवाल येथून लढत आहे.
- भाजपचे २ बंडखोर उमेदवार रामबन, पाड्डेर-नागसैनी मतदारसंघांतून नशीब अजमावीत आहेत.
काँग्रेसमध्ये उत्साह
आझाद यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाच्या एकूण सहापैकी चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.
त्यात माजी महाधिवक्ता मोहंमद अस्लम गनी (भादेरवाह), फातिमा बेगम (इंद्रेवाल), असीम अहमद खांडे (बनिहाल) आणि गिरधारी लाल भाऊ (रामबन) यांचा समावेश आहे. त्यामुळे नॅकाँ-काँग्रेसमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.