निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; व्हिडिओ बनवून व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:55 IST2025-03-20T16:53:10+5:302025-03-20T16:55:44+5:30
मिळनाडूमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली.

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; व्हिडिओ बनवून व्यक्त केली भीती
Tamil Nadu Crime: तमिळनाडूमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. नमाज अदा करुन येत असताना माजी पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून त्याची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत एक व्हिडीओ तयार केला होता. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेचे पडसाद तामिळनाडू विधानसभेतही पाहायला मिळाले.
तामिळनाडूमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी झाकीर हुसेनची हत्या करण्यात आली. ६४ वर्षीय झाकीर हे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या सुरक्षा दलाचा एक भाग होते. या घटनेच्या काही दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये आपल्या जीवाला धोका असून हत्या होऊ शकते असे म्हटले होते. झाकीर हुसेन १८ मार्च रोजी तिरुनेलवेली भागात नमाज अदा करून मोटारसायकलवरून परतत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. झाकीर यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले.
तिरुनेलवेली येथील जुन्या दर्ग्याजवळ जमिनीच्या तुकड्यावरून वाद झाला होता. झाकीर हुसेन हे नूरुन्निसा नावाच्या महिलेकडून ती जमीन परत घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढत होते. ही जमीन आपल्याला आजीकडून वारसाहक्काने मिळाली असल्याचा दावा महिलेने केला होता. आठ वर्षांपूर्वी तिने दलित समाजातील कृष्णमूर्तीशी लग्न केले. लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्याने आपले नाव बदलून मोहम्मद तौफिक ठेवले. २०२२ पासून हा जमिनीचा वाद सुरु झाला. ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचे हुसेन यांनी सांगितले. त्याचवेळी नुरुन्निसा आणि तौफिक यांनी ही त्यांची कौटुंबिक मालमत्ता असल्याचे सांगितले.
मात्र गेल्या वर्षी हे प्रकरण अधिकच चिघळलं. डिसेंबरमध्ये, तौफिक आणि नुरुन्निसा यांनी हुसैनविरुद्ध छळवणूक आणि अवैध धंदे केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हुसैनविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याविरुद्ध हुसेन यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे तक्रार केली. त्यांनी तौफिक कुटुंबीय, पोलिस निरीक्षक गोपाल कृष्णन आणि सहाय्यक आयुक्त सेंथिल कुमार यांच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर झाकीर हुसेन यांनी एक व्हिडीओ शूट केला आणि माझ्या विरोधात कट रचला गेल्याचे सांगितले. मला ज्यांना मारायचे आहे त्यांचीच बाजू पोलीस अधिकारी घेत आहेत असंही हुसेन यांनी म्हटलं होतं. हुसेन यांनी फेब्रुवारीमध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
दरम्यान, खुनाच्या दिवशीच याप्रकरणात दोन जणांनी आत्मसमर्पण केले होते. तौफिकचा भाऊ कार्तिक आणि मेहुणा अकबर शाह यांनी आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी तौफिकचा १९ मार्च रोजी तिरुनेलवेलीच्या हद्दीत शोध घेतला होता. पोलीस त्याला पकडण्यासाठी आले असता तो पळून गेला. यावेळी पोलिसांनी गोळी झाडल्याने तौफिकच्या पायाला लागले. त्याची पत्नी नुरुन्निसाही फरार आहे.