मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:43 IST2025-07-01T11:40:38+5:302025-07-01T11:43:43+5:30
एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे.

फोटो - जागरण
तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यात ६५ वर्षीय निवृत्त सैनिक एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे. एस विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुली दैनंदिन गरजांसाठी त्यांना टोमणे मारत असत आणि संपत्तीवरून भांडत असत. मात्र आता कुटुंब ही संपत्ती परत मिळविण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत आहे.
एस विजयन काही दिवसांपूर्वी अरुलमिगू रेणुगंबल अम्मन मंदिरात गेले आणि त्यांच्या संपत्तीची कागदपत्र दान केली. यामध्ये ३ कोटींची मालमत्ता आणि १ कोटी रुपयांची आणखी एक मालमत्तेचा समावेश होता. मंदिराच्या अधिकाऱ्यांना मंदिराच्या दानपेटीची तपासणी करताना याबाबत माहिती मिळाली.
मंदिराच्या दानपेटीत सापडली संपत्तीची कागदपत्र
मंदिराच्या दानपेट्या दर दोन महिन्यांनी उघडल्या जातात, ज्यामध्ये भक्तांनी दान केलेले पैसे मोजले जातात. यावेळी जेव्हा दानपेटी उघडण्यात आली तेव्हा नाणी आणि नोटांमध्ये संपत्तीची कागदपत्र सापडली. यामध्ये जमिनीची कागदपत्र आणि मंदिराजवळील एक घराचे कागदपत्र होते. यासोबतच एक चिठ्ठी देखील सापडली.
"दानपेटीत कागदपत्र टाकल्याने संपत्ती मंदिराची होत नाही"
मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम. सिलम्बरासन यांनी द हिंदूला दिलेल्या माहितीनुसार, येथे पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, दानपेटीत कागदपत्र टाकल्याने संपत्ती मंदिराची होत नाही. यासाठी देणगीदाराला कायदेशीररित्या देणगीची नोंदणी करावी लागेल.
"मी माझा निर्णय मागे घेणार नाही"
विजयन म्हणाले की, "मी माझी संपत्ती मंदिराच्या नावावर कायदेशीररित्या नोंदणीकृत करेन. मंदिर अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मी हे करेन. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. माझ्या मुलींनी माझ्या दैनंदिन गरजांसाठीही मला टोमणे मारले."
मुलींनी दिली नाही साथ
एस विजयन हे देवाचे भक्त आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या मुलींनी त्यांना साथ दिली नाही. तसेच त्यांच्यावर संपत्ती बळकावण्यासाठी दबाव आणला आहे.
कुटुंबाला मोठा धक्का
विजयन यांच्या निर्णयाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता त्यांचं कुटुंब ही संपत्ती परत मिळवण्यासाठी कायदेशीर मदत घेत आहे. पण विजयन हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.